Thalapathy Vijay Rally : तमिळ अभिनेता थलपती विजयची शनिवारी तामिळनाडूच्या करूरमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या गॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. मात्र, या रॅली दरम्यान शनिवारी संध्याकाळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आणि या घटनेत तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. दरम्यान, ही घटना एवढी भयानक होती की शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांनाही धक्का बसला. ते जेव्हा पीडितांना भेटण्यासाठी करूर रुग्णालयात गेले, तेव्हा तेथे या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आणि मुलांचे मृतदेह पाहून त्यांना अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

मंत्री अनबिल महेश यांना अश्रू अनावर

तामिळनाडूचे शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यामोझी जेव्हा करुर येथील रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे आणि काही नागरिकांचे मृतदेह पाहून दुःख आवरता आलं नाही आणि ते देखील ढसाढसा रडले. अंबिल महेश पोय्यामोझी यांनी म्हटलं की, “या लोकांना (थलपती विजय यांना) वारंवार अटींचं पालन करण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र, अटींचं पालन केलं गेलं नाही. आता हे पुन्हा कधीही घडू नये.”

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी सचिवालयात तातडीची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत आणि जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

नेमकं काय घडलं?

थलपती विजयने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती विजयने मोठी तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या विविध शहरांत रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घटली. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजयने तमिझगा वेत्री कळगम या पक्षाची स्थापना केलेली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपलं भाषण मध्येच थांबवलं.

थलपती विजयने काय म्हटलं?

“जी घटना घडली त्या घटनेमुळे मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी माझ्या वेदना आणि शोक शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. करुरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबांबाबत सहानुभूती व्यक्त करतो.” असं म्हणत थलपती विजयने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट लिहून थलपती विजयने ही प्रतिक्रिया दिली आहे. विजयने जखमींना लवकर बरं वाटावं आणि आराम पडावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असल्याचंही म्हटलं आहे. लवकरात लवकर सगळ्या जखमींना बरं वाटेल अशी आशा आहे असंही त्याने म्हटलं आहे.