विविध राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांसह पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आता काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचं दिसत आहे. निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल्ल यांनी स्वपक्षावरच केलेल्या टीकेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल यांना आमचे अंतर्गत मुद्दे माध्यमासमोर मांडायची गरज नव्हती. यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावाना दुखावल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

”कपिल सिब्बल यांच्या विधानामुळे काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यांना पक्षातील अंतर्गत मुद्दे माध्यमांसमोर मांडायची गरज नव्हती. काँग्रेसने अनेक वाईट दिवसं पाहिलेली आहेत. वर्ष १९६९, १९७७, १९८९ व १९९६ मध्ये पक्ष वाईट काळातून गेला. मात्र पक्षाने आपल्या धोरण, विचारधारा व नेतृत्वावरील विश्वासाच्या बळावर जबरदस्त पुनरागमन केले. वाईट काळात नेहमीच पक्ष अधिक चांगल्या पद्धतीने समोर आला आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात यूपीएने २००४ मध्ये सरकार बनले होते. आताच्या परिस्थितीतूनही आम्ही बाहेर पडू” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “बिहार निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनिकची मजा”

मोठा राजकीय इतिहास लाभलेल्या काँग्रेस पक्षाने आज जणू निवडणुकीतील पराभवांना पक्षाचे ‘नशीब’ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळेच देशातील जनताही काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाही. बिहार आणि वेगवेगळ्या राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालावरून तरी असे वाटत आहे, अशी कठोर टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल्ल यांनी स्वपक्षावरच केलेली आहे. सिबल्ल यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा- काँग्रेसने पराभवाला ‘नशीब’ म्हणून स्वीकारले!

बिहार आणि सात राज्यातील पोटनिवडणुकीतील निकालानंतर सिब्बल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर त्यांनी पक्षातील दरबारी नेत्यांवर देखील टीका केली आहे. विशेष म्हणजे, सिबल्ल यांच्यासह २२ नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांना नेतृत्व बदलाविषयी पत्र लिहिले होते.