अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर या दोघांचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. एकीकडे गाझातील संघर्षाला विराम दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र पाकिस्तानच्या स्तुतीचा राग आळवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत गाझा शांतीच्या २० सूत्री योजनेची माहिती दिली. या दरम्यान ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिरात, जॉर्डनचे राजा यांचायासह पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांच्या पाठिंब्यासाठी त्यांचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन भारताने पाकिस्तानच्या विरोधात शस्त्रविराम केला असा आरोप करणाऱ्या विरोधकांना आता या निमित्ताने नव्या मुद्द्याचं कोलीत मिळालं आहे.

असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ दोघंही आमच्या बरोबरच-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सुरुवातीपासूनच आमच्या बरोबर होते. गाझा शांती योजनेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मी जेव्हा इथून चाललो होतो तेव्हा काही अधिकाऱ्यांनी मला येऊन सांगितलं की पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख या दोघांनीही गाझा शांती योजनेला १०० टक्के पाठिंबा दिला आहे.

शाहबाज शरीफ यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्स पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे. मी गाझा युद्ध समाप्तीच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी जे २० सूत्री शांती योजनेचं पाऊस उचललं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मला खात्री आहे की पॅलेस्टाईन इस्रायल या दोन्ही देशांच्या विकासांसाठी ही शांतता प्रस्थापित होणं महत्त्वाचं असेल. आमचा ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा आहे असं शरीफ म्हणाले. तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्रम्प यांचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. मला खात्री आहे की यामुळे गाझातल्या संघर्षावर चांगला पर्याय मिळू शकेल. तसंच तिथे शांतता, स्थैर्य नांदू शकेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे.