मोदी यांचे कृतार्थ उद्गार
गुजरातची निवडणूक ही निवडणूक यंत्रणेसाठी आदर्श ठरावी, मतदार आता सुज्ञ झाले असून ते भूलथापांना बळी पडत नाहीत. येथे भाजपचा झालेला विजय हा खऱ्या अर्थाने सहा कोटी गुजराती जनतेचा विजय आहे, ज्यांना आपली भरभराट व प्रगती साधायची आहे, त्यांचा हा विजय आहे, भारतमातेचे भले चिंतणाऱ्यांचा हा विजय आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. भाजपला गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून दिल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयमेळाव्यात ते बोलत होते.
या विजयाचे श्रेय माझे नसून हा पक्षाचा व तुम्हा सर्वाचा विजय आहे, मी त्यात खारीचा वाटा उचलला, भाजप मला मातेसमान असून या पक्षाने येथे अनेक वर्षे परिश्रम घेतले आहेत. आपल्याला एका आदर्श राज्याची उभारणी करायची आहे. देशाच्या कोणत्याही प्रांतातील मनुष्य येथे येऊन पोट भरू शकेल, असे वातावरण तयार करायचे आहे. उर्वरित देशाला लाभ होईल एवढी भरभराट गुजरातमधील उद्योगधंदे व शेतीची व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
४५ मिनिटांच्या या भाषणात त्यांनी गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीचा उल्लेख केला नाही. मात्र गुजरातची सेवा करताना माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, काही त्रुटी राहिल्या असतील तर मला माफ करा, गुजरातच्या जनतेने मला क्षमा करावी, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. तुम्ही मला सत्ता दिलीत, आता माझ्या हातून चुका होऊ नयेत यासाठी आशीर्वादही द्या, जनतारूपी देवाने मला आशीर्वाद दिल्यानंतर माझ्याकडून अजाणतेपणीही चुका होणार नाहीत व कोणी दुखावले जाणार नाही, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांनी विजयी मेळाव्यात केलेले भाषण गुजरातीऐवजी हिंदीत होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवूनच त्यांनी हिंदीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भाषणात त्यांनी गुजरातवादी प्रतिमेऐवजी भारतमातेच्या सेवकाची भूमिका मांडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This victory is gujrat 6 crores peoples