Chaitanyananda Saraswati : दिल्लीत सध्या स्वामी चैतन्यानंद प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या विरोधात १७ विद्यार्थिनींनी गैरवर्तन केल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर चैतन्यानंद सरस्वतीला दिल्ली पोलिसांनी अटक देखील केली. तसेच या प्रकरणात पोलीस अधिक सखोल चौकशी करत असून दररोज अनेक खुलासे समोर येत आहेत.
आता पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या तीन महिला सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेच्या कारवाईनंतर तीन महिला मोठी कबुली दिली आहे. या तीन महिलांनी विद्यार्थिनींवर दबाव आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
चौकशीदरम्यान महिलांनी कबूल केलं की त्यांनी चैतन्यानंद सरस्वती (पार्थसारथी) याच्या निर्देशानुसार काम केलं आणि शिस्त व वक्तशीरपणाच्या बहाण्याने विद्यार्थिनींवर दबाव आणला. यामध्ये संस्थेची एक असोसिएट डीन, कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक अशा तीन महिलांना गुन्ह्यात मदत करणे, तक्रारदारांना धमकावणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, तपासकर्त्यांनी अशीही पुष्टी केली की, एका पथकाने उत्तराखंडमधील अल्मोडा येथील एका अतिथीगृहाला भेट दिली होती. त्या ठिकाणी पार्थसारथी महिला विद्यार्थ्यांसोबत राहत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितलं की आरोपीच्या फोनमध्ये काही डिजिटल पुरावे आढळून आले आहेत. ज्यामध्ये एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केलेल्या महिला विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांवर त्याने अनुचित टिप्पण्या केल्याचा समावेश आहे. तसेच या सर्व प्रकरणात पार्थसारथीला कोणताही पश्चात्ताप दाखवला नसल्याचंही सांगितलं जात आहे.
स्वामी चैतन्यानंद पोलिसांना कसा चकवा द्यायचा?
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देत होता. स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असताना पोलिसांना नेमकं कसा चकवा द्यायचा? याबाबत माहिती समोर आली. स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा नाव बदलून हॉटेलमध्ये राहायचा, तसेच फरार असल्याच्या काळात त्याने तब्बल १३ हॉटेल्स बदलले होते. पण तरीही त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
कोण आहेत चैतन्यानंद सरस्वती?
स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचे खरे नाव डॉ. पार्थसारथी असून, तो मूळचा ओडिशातील रहिवासी आहेत. स्वत:ला धर्मगुरू म्हणणारा हा स्वयंघोषित बाबा १२ वर्षांपासून एक आश्रम चालवतो. दिल्लीतील वसंत कुंज परिसरात असलेल्या एका खासगी संस्थेचा तो संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. चैतन्यानंद याचा भूतकाळ वादग्रस्त राहिलेला आहे. २००९ मध्ये त्याने दिल्लीतील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी पोलिसांनी चैतन्यानंद याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. २०१६ मध्ये वसंत कुंज परिसरात एका महिलेने त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांनी त्याला अटक केली होती.