एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या शाळेच्या गटारात सापडल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. बिहारच्या पाटण्यामधील एका शाळेत ही घटना घडली असून त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आख्खी शाळाच पेटवून दिली. या घटनेमुळे आसपासच्या भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी या घटनाक्रमाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी सुरू केली आहे. आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या जाळपोळीचे व्हिडीओ पीटीआयनं एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत.

नेमकं घडलं काय?

पाटण्यामधील टायनी टॉट अकॅडेमी या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी चार वर्षांचं हे मूल शाळेतून घरी परत न आल्यामुळे मुलाचे पालक हवालदील झाले. त्यांनी शाळेत चौकशी केली. मात्र, तुमचा मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी मुलाचा शोध सुरू केला.

…आणि शाळेच्या आवारातच सापडला मृतदेह!

हरवलेल्या मुलासाठी नातेवाईकांनी सर्व ठिकाणी कसून शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी शाळेतच मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. शाळेच्या आतल्या बाजूस असणाऱ्या एका बंद गटारात चिमुकल्याचा मृतदेह पाहून संतापलेल्या नातेवाईकांनी आख्खी शाळाच पेटवून दिली. त्याशिवाय, शाळेसमोरचा रस्ता नातेवाईकांनी बराच काळ अडवून ठेवला. त्यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. काहीं रस्त्यावरच गाड्यांचे टायरही जाळले.

३५ वर्षीय व्यक्तीने केला ५० वर्षीय लिव्ह इन पार्टनरचा खून; इतर पुरुषाशी संबंध असल्याचा होता संशय

पोलीस तपासाचं काय?

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सखोल तपास सुरू केला आहे. “शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये आम्ही या मुलाला शाळेत जाताना पाहिलं. पण पुढच्या संपूर्ण फूटेजमध्ये हे मूल शाळेतून बाहेर येताना मात्र दिसत नाहीये. हे सगळं समोर येताच आरोपींनी भीतीपोटी आतल्या गटारातून या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. त्यानुसार आता गुन्हे नोंद करण्याची प्राथमिक कार्यवाही चालू आहे”, अशी माहिती पाटण्याचे पोलीस अधीक्षक चंद्रप्रकाश यांनी एएनआयला दिली आहे.

पाहा घटनेचा व्हिडीओ

“या प्रकरणात हत्येचाच गुन्हा दाखल केला जात आहे. मृतदेह लपवण्यात आल्याचं दिसून आल्यामुळे त्याच दिशेनं आमचा तपास चालू आहे. शाळेच्या आवारात मृतदेह सापडल्यामुळे शाळेशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. आत्तापर्यंत तीन जणांना आम्ही ताब्यात घेतलं आहे”, असंही चंद्रप्रकाश यांनी सांगितलं.