एक्स्प्रेस वृत्त

हैदराबाद : दक्षिणेकडील प्रसिद्ध तिरुपती देवस्थानात प्रसादाचा लाडू बनवण्यासाठी २०१९ ते २०२४ या कालावधीत अडीचशे कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप वापरल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात समोर आले आहे. उत्तराखंडमधील रूरकीजवळील भगवानपूर येथे एका कारखान्यात प्रसादासाठीचे भेसळयुक्त तूप बनवण्यात येत होते.

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडूचा प्रसाद वाटण्याची ३०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. १७१५ पासून सुरू असलेल्या या परंपरेसाठी विशेष ‘पोटू’ या स्वयंपाकघरात विशेष पंथाचे लोक नेमण्यात आलेले आहेत. दरम्यान, भोलेबाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क प्रा. लि. (हर्ष फ्रेश डेअरी प्रोडक्ट) आणि त्यांच्याशी संलग्न वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज प्रा. लि., मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रोटक्ट्स आणि एआर डेअरी फुड्स प्रा. लि. प्रसादासाठी या भेसळयुक्त तुपाचे वितरण करत होते. हे तूप बनवण्यासाठी पाम तेल, पाम फळाच्या गराचे तेल आणि पामोलिनबरोबर बीटा कॅरोटीन, ॲसेटिक ॲसिड एस्टर आणि तुपाचा स्वाद आणणारे रसायन आदींचा वापर केला जात होता.

सप्टेंबर २०२४ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अमरावती येथील बैठकीत भेसळयुक्त लाडूच्या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांनी तिरुपतीच्या लाडूसाठी तुपाऐवजी प्राणिजन्य चरबीचा वापर केला जात असल्याचा दावा केला आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ‘एसआयटी’ची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे भेसळीसाठी हे घटक वापरताना तुपाचे प्रमाण मात्र कमीत कमी असायचे. हा भेसळीसाठी वापरला जाणारा मुख्य घटकही कारखान्यात बनवला जात होता, असे ‘एसआयटी’च्या तपासात उघड झाले आहे.

२०२२मध्ये सुगावा

तिरुमला तिरुपती देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांना भेसळयुक्त तुपाचा सुगावा २०२२ मध्ये लागला होता. त्यांनी या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली होती. मात्र त्यानंतरही भेसळयुक्त तुपाच्या वितरणास त्यांनी मुभा दिली, असे ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी यापूर्वीच भोलेबाबा डेअरीचे संचालक पोमिल जैन आणि विबीन जैन यांना अटक करण्यात आली आहे.

‘एसआयटी’ने सत्य उघडकीस आणले आहे. आता दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा होईलच. पण हे प्रकरण फक्त भेसळीचे नाही, तर हिंदूंच्या श्रद्धेला हेतुपुरस्सर तडा देण्याचा हा प्रयत्न आहे. भारताच्या खऱ्या अंतरात्म्याला दुखावणारा हा गुन्हा आहे. – नर लोकेश, आंध्र प्रदेशचे मंत्री (चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव)