नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे सवलतीच्या दरात विकल्या जात असलेल्या टोमॅटोचे दर रविवारपासून प्रतिकिलो ९० रुपयांऐवजी ८० रुपये करण्यात आले. सरकारने दिल्ली एनसीआर परिसरात शुक्रवारपासून फिरत्या वाहनाद्वारे ९० रुपये किलो दराने नागरिकांना टोमॅटो उपलब्ध करून दिले होते. शनिवारी या योजनेत आणखी काही शहरांचा समावेश करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत अधिकृतपणे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केल्याने टोमॅटोचे दर कमी होत आहेत. देशात अनेक ठिकाणी अशी विक्री केंद्रे सुरू केली आहेत. देशभरातील पाचशेहून अधिक विक्री केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर रविवार, १६ जुलैपासून सवलतीचा दर ८० रुपये करण्यात आला आहे. रविवारपासून दिल्ली, नोइडा, लखनौ, कानपूर, वाराणसी, पाटणा, मुझफ्फरपूर आणि आरा येथील अनेक केंद्रांवर नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघा (एनसीसीएफ )च्या माध्यमातून टोमॅटोची विक्री सुरू केली आहे, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. देशभरातील ग्राहकांना दिलासा देण्यास कटिबद्ध असल्याचे सरकारने म्हटले आहे.

किरकोळ बाजारात २५० रुपये भाव

कमी उत्पादन आणि पाऊस यामुळे देशातील अनेक शहरांत किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो २५० रुपयांच्या आसपास आहेत. शनिवारी देशात टोमॅटोचे सरासरी दर किलोमागे ११७ रुपये होते, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. शनिवारी टोमॅटोचा कमाल भाव २५०, तर किमान २५ रुपये किलो होता, असे ग्राहक खात्याच्या आकडेवारीतून दिसते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomato price rise tomato rs 80 per kg at government centres zws