अमेरिकेने त्यांच्या देशात मान्यताप्राप्त लसींची यादी अपडेट केली असून ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे, त्यांना देशात प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. हे सुधारित नियम ८ नोव्हेंबरपासून लागू होतील. ८ नोव्हेंबरपासून अमेरिका लसीकरण केलेल्या परदेशी प्रवाशांसाठी देशाची सीमा उघडणार आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) चे प्रेस अधिकारी स्कॉट पॉली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “CDC चे प्रवासाचे नियम FDAने मंजूर केलेल्या किंवा अधिकृत आणि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसींना लागू होते. जसजशी नवीन लसींना परवानगी मिळले, तसतशी त्या लसींची नाव यादीत समाविष्ट केली जातात.”
भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)अखेर बुधवारी मंजुरी दिली. या निर्णयामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर देशाच्या लसीकरण मोहिमेत या लशीचा वापर करण्यात आला. देशात सहा लशींना आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्डबरोबरच कोव्हॅक्सिनच्या लसमात्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे भारत बायोटेकने जूनमध्ये जाहीर केले होते. त्यानंतर या लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळावी, यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्जासह चाचण्यांचा तपशील पाठवला होता. ‘डब्ल्यूएचओ’च्या तज्ज्ञ समितीने अनेक बैठकांमध्ये भारत बायोटेकच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. मात्र, लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया डावलून कोव्हॅक्सिनला घाईघाईत मंजुरी देता येणार नाही, असे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले होते. भारत बायोटेकने लशीसंदर्भातील आवश्यक तपशील लवकरात लवकर सादर केल्यास ही प्रक्रिया वेगाने होईल, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले होते.
‘डब्ल्यूएचओ’च्या तांत्रिक सल्लागार गटाने २६ ऑक्टोबरला भारत बायोटेककडे लशीबाबत आणखी तपशील मागवला होता. संघटनेच्या परवानगीविना कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय नागरिकांच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले होते. कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची प्रतीक्षा लांबल्याने परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या या लसवंतांमध्ये अस्वस्थता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेनिमित्त नुकतीच ‘डब्ल्यूएचओ’च्या संचालकांची भेट घेतली होती.
अखेर तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीनंतर ‘डब्ल्यूएचओ’ने कोव्हॅक्सिन लशीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.