Trump-Putin Alaska Handshake : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अलास्का येथे एकमेकांची भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेला एकमेकांशी हस्तांदोलन करून सुरुवात झाल्याचे पाहायाल मिळाले. या जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांपैकी एक असलेल्या या दोन नेत्यांचे हस्तांदोलन वरवर पाहता मैत्रीपूर्ण दिसत होते, पण त्यामागे दडलेला ‘पॉवर प्ले’ होता, असे एका देहबोली तज्ज्ञाने स्पष्ट केले.

न्यूजवीकशी बोलताना पॅटी अॅन वूड यांनी सांगितले की, त्यांनी एकमेकांना केलेल्या अभिवादनात “आदर, नियंत्रण आणि ओळख” याचे एक मिश्रण होते. तसेच अमेरिका रशिया संबंध आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध यांना वेगळी दिशा मिळू शकेल अशा चर्चेपूर्वी हे दोन्ही नेते अगदी विचारपूर्वक पावले उचलत होते.

सुरुवातीला ट्रम्प यांचा तळहात हा वरच्या बाजूला केलेला होता. वुड यांनी या स्थितीचे वर्णन “कमकुवत, अधिक दुय्यम” असे केले. यातून असे सूचित होते की ट्रम्प हे पुतिन यांना अधिक शक्तिशाली व्यक्तीमत्व मानतात.

वूड पुढे म्हणाल्या की, “ट्रम्प यांना आपला हात वरच्या बाजूला ठेवणे आवडते. तरी, त्यांनी खास ट्रम्प शैली वापरली; ज्यामध्ये ते दुसऱ्या व्यक्तीला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आपल्या शरीराच्या जवळ घट्ट हस्तांदोलन करतात. हे एक शक्तीप्रदर्शन असते.” पुढे दोन्ही नेते एकमेकांकडे पाहून हसले आणि त्यांनी डोळ्यात डोळे घालून पाहिले, यादरम्यान त्यांची डोकी एकमेकांच्या जवळ राहिली. “ज्यामुळे त्यांच्यातील जिव्हाळा दिसून आला,” असे वूड यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी लगेचच त्यांचा डावा हात पुढे करत पुतीन यांच्या हातावर थोपटला आणि ‘डबल हँडशेक’ केला. वूड यांनी या कृतीचे वर्णन हे “एक शिताफीने दिलेला वर्चस्वाचा संदेश” असे केले.

तर पुतिन यांनी याला प्रेमळपणे प्रतिसाद दिला. दोघे चालत असताना ट्रम्प यांचा हात वरच्या स्थितीत गेला, यामुळे पॉवर बॅलेन्स बदलले. “हे हस्तांदोलन बुद्धीबळाचा खेळ आहे”, असेही वूड यावेळी म्हणाल्या.

पुतीन यांच्या चालण्याच्या पद्धतीचेही वूड यांनी विश्लेषण केले. यावेळी त्यांनी पुतिन हे त्यांचे हात सैल सोडून हालवत चालत असल्याचे नमूद केले, जे की सही महिन्यापूर्वी असे नव्हते, तेव्हा ते अधिक कठोर होते, असे त्या म्हणाल्या. ट्रम्प यांनी त्यांचे हात बंद ठेवले, त्यांनी पुतिन यांचा कोपर पकडला आणि हळू आवाजात काहीतरी बोलण्यासाठी त्यांच्याजवळ झुकले. “हे ताब्यात घेणे आणि जवळीकतेचे संकेत अशा दोन्ही गोष्टी दर्शवते,” असे वूड म्हणाल्या.

फोटो काढताना पुतीन यांनी आपले हात उघडले आणि मिटले. वूड म्हणाल्या की, “ही परिस्थितीला समोर जाण्याची तयारी असू शकते, तसेच हे शारीरिक समस्येशी संबधितही असू शकते.”

“दोन्ही नेते हसणे हे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमिवर एक राजकीय नाटक आहे,” असेही वूड म्हणाल्या. तसेच वर्चस्वास्ठी रस्सीखेच सुरू असतानाही हा क्षण मैत्रीपूर्ण होता असेही त्यांनी सांगितले. “दोन जुने मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटत असल्यासारखे वाटत होते,” असे त्यांनी सांगितले