ट्विटरमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू असतानाच एलॉन मस्क यांनी नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर केलं आहे. त्याचबरोबर काही बंद खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही ट्विटरनं घेतला आहे. “ट्विटरच्या नव्या धोरणात बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, पण पोहोचण्याचं नाही”, असं ट्वीट एलॉन मस्क यांनी केलं आहे. “नकारात्मक आणि द्वेषयुक्त ट्विट्स काढून टाकले जातील. अशा ट्विट्सच्या जाहिराती ट्विटर चालवणार नाही. जोपर्यंत ट्विट्स विशेषत: शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत ते सापडणार नाहीत”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. हे नियम केवळ वैयक्तिक ट्विटला लागू असून संपूर्ण खात्याला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला नसल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे. त्यांचं खातं पुन्हा सुरू करावं की नाही? यासाठी ट्विटरकडून पोल घेतला जात आहे. कॉमेडियन कॅथी ग्रिफिन आणि पुराणमतवादी समालोचक जॉर्डन पीटरसन यांची ट्विटर खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

दरम्यान, ट्विटरची कार्यालयं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहेत. ही कार्यालयं २१ नोव्हेंबरला उघडणार आहेत. कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून ट्विटरमधून अनेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. कार्यक्षमरित्या जास्त तास काम न केल्यास नोकरीचा राजीनामा देण्यास कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अथवा माध्यमांशी कंपनीच्या गोपनीय माहितीविषयी चर्चा करणं टाळा आणि कंपनीच्या नियमांचं पालन करा, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter owner elon musk announced a new content moderation policy said negative hate tweets will be deboosted rvs