पीटीआय, गोपेश्वर (उत्तराखंड)
उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात झालेला जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे गुरुवारी चार गावांतील ४० घरे भुईसपाट झाली असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून, या घटनेत पाच जण जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना हृषीकेश येथील ‘एम्स’ येथे उपचारांसाठी नेण्यात आले आहे.
चामोलीपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदनगर क्षेत्रातील ही चारही गावे आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले, ‘चार गावांतील ३३ घरांना भूस्खलन आणि जोरदार पावसाचा फटका बसला. काही दुकाने आणि जनावरांचे गोठे अक्षरश: नष्ट झाले. अनेक नागरिक बेपत्ता असून, एकूण २०० लोकांना पावसाचा फटका बसला आहे. राष्ट्रीय आणि राज्य संकट प्रतिसाद दल (एनडीआरएफ आणि एसडीआरएफ) शोधमोहीम राबवीत आहेत.’ चामोली जिल्ह्याचे महादंडाधिकारी संदीप तिवारी यांच्याबरोबर त्यांनी दूरदृश्य प्रणालीतून संवाद साधला. शोधमोहीम आणि बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.