संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली असून विविध देशांचे प्रमुख अमेरिकेत पोहोचले आहेत. या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची कार न्यूयॉर्क पोलिसांनी थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन इमॅन्युएल यांना पोलिसांनी थांबवल्यानंतर त्यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन लावल्याचे दिसले.
मॅक्रॉन यांची कार न्यूयॉर्क पोलिसांनी रोखली
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८०व्या अधिवेशनात मॅक्रॉन यांनी भाषण केल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून बाहेर पडून फ्रेंच दूतावासाकडे जाण्याच्या तयारीत असताना, न्यूयॉर्क पोलिसांनी मॅक्रॉन यांची गाडी थांबवली आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यासाठी मार्ग सुरक्षित केला.
“तुमच्यामुळे मी…”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी मॅक्रॉन यांची माफी मागताना दिसत आहे. “मला माफ करा, मिस्टर प्रेसिडेंट. आता सर्व रस्ते बंद केले आहेत”, असे तो अधिकारी म्हणतो. यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष त्यांच्या कारमधून बाहेर पडले. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना फोन केला आणि विनोदी स्वरात म्हणाले, “तुमच्यामुळे मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे.” यावेळी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या सहाय्यकांनी हा संवाद ऐकला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला.
सेल्फी आणि फोटोंसाठी नागरिकांची गर्दी
डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा गेल्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष त्यांच्या गाडीत परत बसले नाहीत. ते ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलत रस्त्यावरून चालू लागले. न्यूयॉर्कवासीयांसाठी हे एक दुर्मिळ दृश्य होते, कारण फ्रेंच राष्ट्राध्यक्ष न्यूयॉर्कच्या रस्त्यावर कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय चालत होते. यावेळी मॅक्रॉन यांच्याबरोबर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ला डेपेच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या कपाळावर चुंबन घेतल्याचेही दिसून आले.
पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता
तत्पूर्वी, मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत घोषणा केली की, फ्रान्सने पॅलेस्टाईनला औपचारिकपणे देश म्हणून मान्यता दिली आहे. मॅक्रॉन म्हणाले की “शांततेची वेळ आली असून, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे कोणतेही समर्थन करत नाही”. फ्रान्सपूर्वी ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, कॅनडा आणि पोर्तुगालने यांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली आहे.