राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्दही नव्हते याला काय म्हणायचं असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला आहे. राहुल गांधी म्हणाले की मी भारत जोडो यात्रा नुकतीच संपवली आहे. या भारत जोडो यात्रेत लोक मला येऊन येऊन देशातले प्रश्न सांगत होते. अनेकांनी आम्हाला सांगितलं की बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येशी आम्ही अक्षरशः झुंज देत आहोत. देशात ही स्थिती असताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारी आणि महागाई हे दोन शब्दही नव्हते याला काय म्हणावं? देशात परिस्थिती वेगळी आहे आणि अभिभाषण वेगळंच सांगतं आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेबाबत भाष्य केलं. भारत जोडो यात्रेत आम्हाला लोकांनी समस्या सांगितल्या. सुरूवातीला ती काँँग्रेसची यात्रा होती. नंतर ती लोकांची यात्रा झाली. कारण आमच्या यात्रेत सगळेच लोक येत होते. आमच्या यात्रेला कुठलीही बंधनं नव्हती. सगळ्या जातीचे, धर्माचे लोक आमच्यासोबत आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या. त्यावरून माझं निरीक्षण हे आहे की देशात बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या आहेत. त्याचा उल्लेखही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात करण्यात आला नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

अदाणींसाठी विमानतळांचा नियम बदलण्यात आला असं वाक्य राहुल गांधी यांनी उच्चारलं आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला. तुम्ही कुठल्या नियमाविषयी बोलत आहात त्याचे पुरावे दाखवा उगाच हवेत आरोप करू नका असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. तर किरेण रिजेजू यांनीही राहुल गांधी यांना पुरावे सादर करा असं आव्हान दिलं. त्यावर आम्ही लवकरच पुरावे सादर करू असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

अदाणींना सुरक्षा क्षेत्रातला काहीही अनुभव नव्हता. मात्र ते ड्रोन्स तयार करतात जे लष्कर, नौदल आणि हवाईदलासाठी वापरले जातात. एचएलच्या माध्यमातून हे काम अदाणींना दिलं गेलं. पंतप्रधान इस्रायलला जातात आणि त्यानंतर अदाणींना काम मिळालं. जे एअरपोर्ट्सच्या बाबत झालं तेच याबाबत झालं. कुठलाही अनुभव नसताना हे काम अदाणींना देण्यात आलं असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आणखी एक रंजक गोष्ट सांगतो अल्फा डिफेन्स नावाची कंपनी आहे ती कंपनीही अदाणींच्या हवाले करण्यात आली. भारत आणि इस्रायल यांच्यातला शस्त्रास्त्रांचा व्यापार ९० टक्के अदाणींकडे आहे. ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तिथेही त्यांनी अदाणींचा फायदा करून दिला. काय जादू झाली माहित नाही वन बिलियन डॉलर्सचं लोन अदाणींना तिथल्या बँकेने उपलब्ध करून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशात गेले होते. त्यांना वीज देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर पंधरा दिवसातच अदाणी आणि बांगलादेश यांच्यात २५ वर्षांसाठी करार झाला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployment and inflation were not even two words in the president address rahul gandhi was aggressive in the lok sabha scj