देशात पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत असून आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लादली आहे. करोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन करोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ‘२०२० च्या तुलनेत आता डॉक्टरांकडे जास्त अनुभव आहे. या आजाराचं गांभीर्य आम्हाला माहिती आहे. आत्मविश्वासाने आम्ही या परिस्थितीला तोंड देऊ’, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

धोक्याचा इशारा! भारतात कोविडमुळे दररोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू

केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी केली. तसेच रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. पीपीई किटमध्ये त्यांनी पूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.

देशातील दहा राज्यांमध्ये गेल्या २४ तासात करोनामुळे एकही मृत्यूची नोंद नसल्याने थोडाफार दिलासा आहे. लडाख, त्रिपुरा, मेघालय, सिक्किम, नागालँड, मिझोरम, मणिपूर, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार द्वीप आणि अरुणाचल प्रदेशात गेल्या २४ तासात एकही करोना रुग्ण दगावला नाही.

देशात मृत्यूचं थैमान! सलग तिसऱ्या दिवशी हजारांहून अधिक करोनाबळी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union health minister harsh wardhan on doctor experience about corona rmt