UPSC To Verify Candidate Certificates Through DigiLocker: गेल्या वर्षी गाजलेल्या पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूपीएससी परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची विविध प्रमाणपत्रे डिजीलॉकरद्वारे स्वीकारली जाणार असल्याची माहिती यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी दिली. डिजीलॉकर हे कागदपत्रे डिजिटली साठवण्यासाठी आणि त्यांची पडताळणी करण्यासाठीचा केंद्र सरकारचा क्लाउड प्लॅटफॉर्म आहे.
बुधवारी दूरदर्शनने प्रसारित केलेल्या व्हर्च्युअल टाउन हॉलमध्ये अजय कुमार यांनी पहिल्यांदाच भाषण केले. ज्यामध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्यांकडून ईमेलद्वारे पाठवलेल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यूपीएससी परीक्षेतील गैरप्रकार आणि निलंबित प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाबद्दल विचारले असता, अजय कुमार म्हणाले, “याबाबत आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आम्ही गैरप्रकार करणाऱ्यांच्या विरोधातच आहोत. पूजा खेडकर यांच्यावर कारवाई सुरू आहे. नियमांनुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या उमेदवारांना किमान तीन वर्षांसाठी निलंबित केले जाते आणि गुन्हेगारी फसवणुकीच्या बाबतीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईदेखील केली जाते.
उमेदवारांकडून सादर केल्या जाणाऱ्या बनावट प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना अजय कुमार म्हणाले की, यूपीएससी लवकरच डिजीलॉकरद्वारे प्रमाणपत्रे स्वीकारणे सुरू करणार आहे. उमेदवार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्रे, अपंगत्व प्रमाणपत्रे आणि उत्पन्न प्रमाणपत्रे यासह विविध प्रमाणपत्रे सादर करतात.
“अनेकदा प्रश्न उद्भवतात की, सादर केलेली प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या प्राधिकरणाने जारी केली आहेत की नाही. आम्ही लवकरच ही प्रमाणपत्रे डिजीलॉकरद्वारे घेणे सुरू करणार आहोत, जेणेकरून ती खरी आहेत याची खात्री होईल”, असे ते म्हणाले.
२०२२ मध्ये केंद्रीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या पूजा खेडकरवर, परीक्षेला बसण्याचे ९ प्रयत्न संपल्यानंतरही, परीक्षा दिल्याचा आरोप आहे. यासाठी तिने स्वतःची आणि तिच्या पालकांची नावे बदलून वेगळी उमेदवार म्हणून बसली आणि परीक्षा उत्तीर्ण झाली, असे आरोप आहेत. २०२४ मध्ये यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. याचबरोबर भविष्यात तिला परीक्षेला बसण्यास बंदी घातली होती.