पीटीआय, नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून रविवारी, पाच दिवसांत तिसऱ्यांदा दिल्ली पोलीस काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी धडकले. त्यानंतर पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला राहुल गांधी यांनी चार पानांचे प्राथमिक उत्तर दिले. यात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून वक्तव्याला दीड महिना उलटल्यानंतर अचानक चौकशी करण्याची निकड काय आहे, असा सवाल केला आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त सागर प्रीत हुडा यांच्या नेतृत्वाखालील पथक रविवारी सकाळी १० वाजता राहुल गांधी यांच्या १२, तुघलक मार्ग येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते जमा झाले होते. तर पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. पोलीस गेल्यानंतर काही तासांनी राहुल यांनी लेखी उत्तर पाठवले. या उत्तरामध्ये राहुल यांनी १० मुद्दय़ांचा समावेश केला आहे. नोटिशीला तपशीलवार उत्तर देण्यासाठी त्यांनी आठ ते दहा दिवसांचा वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महिलांनी मला त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली होती, महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होतात’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी ३० जानेवारी रोजी यात्रेची सांगता होताना श्रीनगर येथील सभेमध्ये केले होते. त्याच्या आधारे केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी गुरुवारी राहुल यांना त्या महिलांची माहिती देण्यासाठी नोटीस बजावली होती. पीडित महिलांना सुरक्षा पुरवण्यासाठी ही माहिती मागत असल्याचा दावा पोलिसांनी केला.
आपण आधी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना भेटलेल्या स्त्रियांबाबत माहिती घेऊन पीडित महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र असा कोणताही प्रकार घडल्याचे आढळून आले नसल्यामुळे अखेर राहुल गांधी यांच्याकडून माहिती घेण्याचा निर्णय घेतल्याचे हुडा यांनी सांगितले. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, ज्येष्ठ काँग्रेस वरिष्ठ जयराम रमेश, अभिषेक मनु सिंघवी यांनी या कारवाईवर जोरदार आक्षेप घेतला. राहुल गांधी यांच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी सूडबुद्धी, धाकदपटशा आणि छळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजकीय भाषणांमध्ये केलेल्या वक्तव्यांचा आधार घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले जात असतील, तर भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजप नेत्यांच्या भाषणांबद्दल अशी कारवाई होऊ शकते.
– अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
राहुल गांधी यांनी दावा केलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती द्यायला हवी होती. त्यामुळेच दिल्ली पोलीस कायदेशीर प्रक्रियेद्वारे माहिती घेत आहेत. त्यासाठीच ते राहुल गांधी यांना भेटले आहेत.
– संबित पात्रा, प्रवक्ते, भाजप
राहुल गांधी यांचे पोलिसांना प्रश्न
- वक्तव्य केल्याच्या ४५ दिवसांनंतर अचानक चौकशी करण्याची कोणती निकड होती?
- अदानी प्रकरणावर आपण संसदेमध्ये आणि संसदेबाहेर घेतलेल्या भूमिकेशी या चौकशीचा काही संबंध आहे का?
- सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या कार्यक्रमातील भाषणांची अशीच छाननी केली जाते का?