पीटीआय, नवी दिल्ली

अमेरिका भारताशी असलेल्या संबंधांना खूप महत्त्व देतो, असे प्रतिपादन भारतात नियुक्त अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर केले. अमेरिकन संसदेने भारतातील अमेरिकचेे राजदूत म्हणून नियुक्ती केल्यानंतर गोर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ते सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत व्यवस्थापन व संसाधन उपमंत्री मायकल रिगासही आहेत.भारतात आगमन झाल्यानंतर गोर यांनी शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेदरम्यान संरक्षण, व्यापार आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा झाली. या चर्चेत खनिजांवरील मुद्दाही होता. चीनने त्यावर निर्यातबंदी लादली आहे.

पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी गोर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्यापासून भारताचे अमेरिकेशी संबंध ताणले गेले आहेत. भारताने अमेरिकेच्या या कृतीचे वर्णन अन्याय्य आणि अवास्तव असे केले आहे. तथापि, ट्रम्प आणि मोदी यांच्यातील अलीकडच्या संभाषणामुळे ताणलेल्या संबंधांमध्ये सकारात्मक बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदींसोबत एक अद्भुत बैठक झाली. या बैठकीत आम्ही संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञानासह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. खनिजांचे दोन्ही देशांसाठी महत्त्व यावर देखील चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल आशावादी आहे. ट्रम्प मोदींना खूप चांगले आणि वैयक्तिक मित्र मानतात. – सर्जियो गोर, राजदूत, अमेरिका

अमेरिका नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांचे भारतात स्वागत करताना आनंद झाला. मला विश्वास आहे की त्यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जयशंकर यांच्याशीही चर्चा

भारत-अमेरिका संबंधांबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली. अमेरिकेने भारतीय उत्पदनांवर लादलेलेे ५० टक्के आयातशुल्क आणि त्यामुळे उभय देशांतील संबंधांमध्ये आलेले वितुष्ट या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आले होते.मुळात गोर हे व्हाइट हाऊसमध्ये कर्मचारी विभागाचे संचालक असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जातात. त्यांची या पदासाठी ऑगस्टमध्येच शिफारस करण्यात आली होती.