Pakistan Defence Minister Khawaja Asif Remark on America: अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उद्योगाला नफा व्हावा, यासाठी अमेरिका जाणूनबुजून जागतिक संघर्षाला हवा देतो, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले असून त्यांच्या विधानावर आता वाद निर्माण झाला आहे. ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून जगभरातून त्यावर चर्चा केली जात आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ख्वाजा आसिफा यांनी अमेरिकेवर आरोप करताना म्हटले की, मागच्या शतकातील अनेक आंतरराष्ट्रीय वादाच्या केंद्रस्थानी अमेरिकेचा महत्त्वाचा हात होता. “मागच्या १०० वर्षांत अमेरिकेमुळे अनेक युद्ध झाले. त्यांनी २६० युद्ध लढली तर चीन केवळ तीन वेळा युद्धात सहभागी होता. अमेरिका युद्धाच्या माध्यमातून बराच पैसा कमवतो. लष्करी उद्योग हे अमेरिकेचे एक मोठे उत्पन्नाचे साधन असून जीडीपीतही या उद्योगाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच अमेरिका संघर्ष निर्माण करत असतो”, असा दावा ख्वाजा आसिफ यांनी केला.

जागतिक संघर्षात अमेरिकेचा फायदा

सीरिया, इजिप्त, अफगाणिस्तान आणि लिबिया सारख्या देशांचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, ही राष्ट्रे एकेकाळी समृद्ध होती. परंतु दीर्घकाळ चाललेल्या युद्धांमुळे आता उध्वस्त झाली आहेत. एकेकाळी श्रीमंत असणारे देश आता दिवाळखोर झाले आहेत. त्यांच्या पतनास अमेरिका जबाबदार आहे, असा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला.

आसिफ यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेच्या लष्कर आणि त्यावर आधारित उद्योगांचा फायदा व्हावा, यासाठी युद्धात दोन्ही बाजूंनी त्यांचा सहभाग असतो. आसिफ यांनी अमेरिकन संरक्षण क्षेत्राला आर्थिक यंत्र म्हटले आहे. यातून अमेरिका जगभरात अराजकता आणि अस्थिरता माजवतो.

ख्वाजा आसिफ यांच्या विधानावर वाद

दरम्यान ख्वाजा आसिफ यांचे विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरच अधिक टीका होत आहे. अनेकांनी सांगितले की, पाकिस्तान स्वतः अमेरिकेकडून लष्करी मदत आणि त्यांची उपकरणे खरेदी करतो. एका युजरने म्हटले की, जेव्हा पाकिस्तानला मदतीची गरज होती तेव्हा ते अमेरिकेचे पाय धरत होते. आता भारताबरोबर शस्त्रसंधीची घोषणा होताच ते अमेरिकेला दोष देत आहेत.

तर काही युजर आसिफ यांच्या मताशी अंशतः सहमत आहेत. अमेरिका अनेक देशांना शस्त्रास्त्र पुरवतो, असे काहींचे म्हणणे आहे. अमेरिकेला जगात तणाव निर्माण करून आपली शस्त्रे विकायची असतात, असेही काही युजर्सनी म्हटले.