पीटीआय, वॉशिंग्टन
‘अमेरिकेला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी ऐतिहासिक अशा वेगाने काम करीन,’ अशी ग्वाही अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉशिंग्टन येथील ‘कॅपिटॉल वन अरीना’ येथे ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. ‘मेक अमेरिका ग्रेट’ विजय सोहळ्यासाठी २० हजार क्षमतेचे ‘कॅपिटॉल वन’ पूर्णपणे भरले होते. कडाक्याच्या थंडीमध्येही अनेक नागरिक उपस्थित होते. ट्रम्प म्हणाले, ‘उद्यापासून सुरू होणाऱ्या माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय वेगाने पूर्ण शक्तीने काम करीन. देशाला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या मार्गी लावेन. आपल्याला हे करावेच लागेल. अध्यक्षपदावर येण्यापूर्वीच कुणालाही अपेक्षित नसलेल्या समस्यांचे निकाल लागताना तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक जण याला ‘ट्रम्प इफेक्ट’ म्हणत आहे.’

हेही वाचा :दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर

ट्रम्प म्हणाले, ‘निवडणुकीपासून शेअर बाजारात तेजी आहे. छोट्या व्यावसायिकांचा आशावादही खूप वाढला आहे. बिटकॉइन विक्रम करीत आहे. ‘डीएमएसीसी’ २० ते ४० अब्ज तर ‘सॉफ्टबँक’ने १०० ते २०० अब्ज डॉलर गुंतवणुकीचे वचन दिले आहे. आपण निवडणुका जिंकल्यामुळे गुंतवणूक येत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.’

‘अमेरिकेसाठी हा आनंद सोहळा’

वॉशिंग्टन: ‘ट्रम्प यांचा अध्यक्षपदासाठीचा शपथविधी अमेरिकेसाठी आनंदाचा सोहळा आहे,’ अशी भावना भारतीय अमेरिकींनी व्यक्त केली आहे. देशामध्ये मोठे बदल अपेक्षित असून, नव्या प्रशासनाच्या काळात भारताबरोबरील संबंध अमेरिकेचे संबंध पाहण्याची मोठी उत्सुकता असल्याची प्रतिक्रिया आशा जडेजा मोटवानी या ट्रम्प समर्थक महिलेने व्यक्त केली. तर ‘इंडियास्पोरा’ या भारतीय समूहाच्या असलेल्या संस्थेने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्या काळात भारताबरोबरील अमेरिकेचे संबंध आणखी सुधारतील, अशी अपेक्षा ‘इंडियास्पोरा’चे संस्थापक अध्यक्ष एम. आर. रंगास्वामी यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षपाच्या काळात काही भारतीय अमेरिकींची विविध पदांवर नियुक्ती केली आहे. त्यामध्ये हरमीत कौर धिल्लन, विवेक रामास्वामी, काश पटेल, जय भट्टाचार्य, श्रीराम कृष्णन आदींचा समावेश करावा लागेल.

हेही वाचा :केरळच्या महिलेला फाशीची शिक्षा

स्थलांतरितांना परत पाठविण्याच्या धोरणावर टीका

रोम: ‘स्थलांतरितांचे सामूहिक प्रत्यार्पण करण्याचे ट्रम्प यांचे नियोजन एक कलंक ठरेल,’ अशी प्रतिक्रिया पोप फ्रान्सिस यांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला दिली. पोप यांनी १० वर्षांपूर्वी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्याच्या ट्रम्प यांच्या सूचनेनंतर ते ख्रिाश्चन नव्हेत, अशी प्रतिक्रिया दिली होती. एका कार्यक्रमात पोप बोलत होते. स्थलांतरितांना सामूहिकरीत्या परत पाठविण्याच्या ट्रम्प यांच्या नियोजनावर विचारले असता, पोप म्हणाले, ‘हे खरेच असेल, तर तो एक कलंक ठरेल. समस्या सोडविण्याचा हा मार्ग नव्हे.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president donald trump make america great speedy work for country css