US Senator Lindsey Graham warns India : अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, “चीन, भारत व ब्राझीलला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कारवाईचा सामना करावा लागू शकतो. ट्रम्प हे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर आयात शुल्क लावणार आहेत. यामध्ये चीन, भारत व ब्राझीलसह इतर काही देशांचा समावेश आहे.” रशिया जितकं तेल निर्यात करतो, त्यापैकी ८० टक्के वाटा केवळ या तीन देशांचा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईचं समर्थन करत व त्याची कारणं सांगत ग्रॅहम म्हणाले की या “देशांचा रशियाबरोबर चालू असलेला हा व्यापार व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धखोरीला चालना देतो. जग युक्रेनमधील संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चीन, भारत व ब्राझीलसारखे देश रशियाला अप्रत्यक्षपणे मोठं करत आहेत.” लिंडसे ग्रॅहम एवढंच बोलून थांबले नाहीत. ते म्हणाले, “भारत, चीन व ब्राझील या देशांनी रशियन तेल खरेदी करणं चालू ठेवलं तर आम्ही त्यांच्या अर्थव्यवस्थेची वाट लावू.” लिंडसे फॉक्स न्यूजशी बोलत होते.

“…तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू”

अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर म्हणाले, “भारत, चीन व ब्राझील या देशांना मी इतकंच सांगेन की त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध चालू ठेवण्यासाठी किफायतशीर रशियन तेल खरेदी करणं चालू ठेवलं तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू. कारण तुम्ही जे पैसे वाचवत आहात ते रक्ताने माखलेले आहेत.”

“ट्रम्प प्रशासन निर्णायक कारवाई करण्यास सज्ज आहे. तसेच आमच्या अध्यक्षांनी पुतिन यांना त्यांची लष्करी कारवाई थांबवण्यासाठी ५० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा रशियाला कठोर निर्बंधांचा सामना करावा लागेल. यामध्ये तेलाच्या खरेदीपासून रशियन अर्थव्यवस्थेला सहाय्य करणाऱ्या देशांवरील दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राजकारण व परराष्ट्र धोरणांमधील स्कॉटी शेफलर (दिग्गज अमेरिकन गोल्फपटू) आहेत, ते तुम्हाला पूर्णपणे हरवतील.”

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रलंबित आहे. ग्रॅहम यांच्या या वक्तव्याकडे ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी व्यापार व युद्धकाळातील निधीबाबतची आक्रमक भूमिका म्हणून पाहिलं जात आहे.