वृत्तसंस्था, कीव
गेल्या अनेक महिन्यांच्या तणावपूर्ण वाटाघाटींनंतर बुधवारी अमेरिका आणि युक्रेनने खनिज करार करण्यात आला. या कराराद्वारे अमेरिकेला युक्रेनच्या महत्त्वाच्या खनिज आणि इतर नैसर्गिक संसाधनांमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. शिवाय युक्रेनलाही रशियाविरुद्ध संरक्षणासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळण्याची आशा आहे.
युक्रेनमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, मागील करारांपेक्षा सध्याचा करार युक्रेनसाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे युक्रेन कनिष्ठ भागीदार झाला असून, अमेरिकेला येथील संसाधनांवर अभूतपूर्व अधिकार मिळाले. हा करारा अद्याप सार्वजनिक करण्यात आला नसून, अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाने त्यातील काही तपशील दिले आहेत. कराराद्वारे युक्रेनला विविध मार्गांद्वारे निधी गोळा करणे शक्य होईल. तसेच भविष्यात अमेरिकची लष्करी मदत सुनिश्चित करण्यासाठी हा करार एक साधन असेल, अशी अपेक्षा युक्रेनच्या अधिकाऱ्यांना आहे.
याआधीचा करार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. वान्स आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील तणावपूर्ण बैठकीत स्वाक्षरीच्या टप्प्यात होता. युक्रेनने अण्वस्त्र शस्त्रास्त्रे सोडून जागतिक सुरक्षेत दिलेल्या योगदानाची दखल करारातून घेण्यात आली, असे युक्रेनच्या अर्थमंत्री युलिया स्वेरीडेन्को यांनी सांगितले.
करारात काय?
● या करारात पृथ्वीवरील दुर्मीळ घटकांसह खनिजे, तेल आणि नैसर्गिक वायूंसह इतर मौल्यवान संसाधनांचा समावेश आहे. त्यात युक्रेनसाठी आधीच उत्पन्नाचे स्राोत असलेल्या संसाधनांचा समावेश नाही. या करारांतर्गत कोणताही नफा नवीन गुंतवणुकीच्या यशावर अवलंबून असतो.
● ट्रम्प यांनी युक्रेनच्या दुर्मीळ खनिज घटकांमध्ये वारंवार रस व्यक्त केला आहे. परंतु या करारात इतर कोणती खनिजे असू शकतात, हे स्पष्ट नाही. युक्रेनच्या अध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख आंद्री येरमाक यांनी सांगितले की दुर्मीळ खनिजांमध्ये लिथियम, टायटॅनियम किंवा युरेनियमचा समावेश असू शकतो.