एक्स्प्रेस वृत्त : नवी दिल्ली : गुजरात दंगलींवरील ‘बीसीसी’चा वृत्तपट हटविण्याविरोधात दाखल याचिकांवरून केंद्राला नोटीस बजावल्याबद्दल संघ विचारांचे नियतकालिक ‘पाञ्चजन्य’मधून सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्यात आली आहे. देशविरोधी शक्तींकडून सर्वोच्च न्यायालयाचा हत्यारासारखा वापर केला जात असल्याचा आरोपही नियतकालिकाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

‘बीबीसी’च्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने कारवाई करण्याच्या आदल्याच दिवशी ‘पाञ्चजन्य’चा ताजा अंक प्रकाशित झाला आहे. त्याच्या अग्रलेखात संपादक हितेश शंकर यांनी ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या ‘बीबीसी’च्या वृत्तपटावरील कारवाईबाबत मतप्रदर्शन केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालय भारताचे आहे, जे भारतातील करदात्यांच्या निधीवर चालते. त्याचे काम भारतीय राज्यघटनेनुसार कार्य करणे, हे आहे.

सर्वोच्च न्यायालय नामक सुविधेचे सृजन आणि त्याची देखभाल ही आपल्या देशाच्या हितासाठी केली गेली आहे. मात्र, भारतविरोधी शक्ती आपला मार्ग प्रशस्त करण्यासाठी एखाद्या हत्यारासारखा त्याचा (सर्वोच्च न्यायालय) वापर करीत आहेत’’, असे त्यात म्हटले आहे. मानवाधिकाराच्या नावाखाली दहशतवाद आणि पर्यावरणाच्या नावाखाली देशाचा विकास रोखला जात असल्याचा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

‘‘देशविरोधी शक्ती देशाची लोकशाही, सार्वभौमत्व याचा वापर आपले हेतू साध्य करण्यासाठी करत आहेत. त्यांचे पुढचे पाऊल हे देशाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा अधिकार मिळावा हे आहे. देश खिळखिळा करण्यासाठी धर्मातराचा अधिकार हवा आहे. एवढेच नाही, तर त्यासाठी त्यांना भारतीय कायद्यांचे संरक्षण हवे आहे,’ अशा शब्दांत अग्रलेखात टीका करण्यात आली आहे.

विपर्यस्त माहितीद्वारे देशविरोधी प्रचार : उपराष्ट्रपती

विपर्यास केलेल्या माहितीचा वापर देशाची विकासगाथा बिघडविण्यासाठी केला जात आहे, अशी टीका उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बुधवारी केली. भारतीय माहिती सेवेच्या (आयआयएस) परिविक्षाधीन उमेदवारांशी आपल्या निवासस्थानी केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. लोकशाही आणि राष्ट्रवादाचे सच्चे संरक्षक होण्याचा सल्लाही त्यांनी या उमेदवारांना दिला. गेल्या दशकभरात स्वत:च्या नावलौकिकाचा दावा करणाऱ्या जागतिक माध्यमांकडून कुणाकडे सार्वत्रिक संहाराची अस्त्रे आहेत, यासारख्या कथा पसरविल्या गेल्या. अमेरिकेने पसरविलेले हे वृत्त पाश्चिमात्य देशांनी उचलून धरले आणि त्याआधारे सद्दाम हुसेन यांच्या इराकमध्ये सैन्य घुसविण्यात आले. मात्र संहारक अस्त्रांचा दावा नंतर चुकीचा असल्याचे समोर आले. याचा संदर्भ देत उपराष्ट्रपतींनी पाश्चिमात्य माध्यमांवर टीका केली.