उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफळला असून, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लखीपूर खीरी येथील वातावरण कमालीचे तापले आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या आठ जणांमध्ये चार आंदोलक शेतकरी आणि चारजण एका प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरामधील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियोजित दौरे रद्द केले, असल्याची देखील माहिती समोर आली आहे. याशिवाय, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या लखीमपूर येथे जाणार आहेत. काँग्रेससह विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

सर्वात अगोदर आज सायंकाळी बातमी आली होती की आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कार गेल्याने, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी आंदोलन करण्यासाठी जात होते. ही घटना घडल्याने गोंधळ उडाला आणि घटनास्थळी उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी तीन वाहने पेटवून दिली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून एडीजी एल ओ प्रशांत कुमार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ लखीमपूर खीरी येथे पाठवलं होतं.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की विरोध करणाऱ्यांवर केंद्रीयमंत्र्यांच्या मुलाने कार चढवली. ज्यामुळे अनेक शेतकरी जखमी देखील झाले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर, संतप्त शेतकऱ्यांनी केलेल्या मारहणाीत वाहन चालकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

शेतकरी आंदोलन : लखीमपूर खीरी येथील घटनेचा शरद पवारांनी नोंदवला तीव्र निषेध, म्हणाले…

नेमकं काय घडलं?

मीडिया अहवालानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी (३ ऑक्टोबर ) तेनी गावात बनवीरमध्ये डेप्युटी सीएम केशव प्रसाद यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावाच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. यावेळी, शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले. तर याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.