लस पुरवठ्यावरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने आलं आहे. केंद्र सरकारकडून दिल्लीला व्यवस्थित लस पुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. असं असेल तर लसीकरणाला १५-१६ महिने लागतील, असंही सिसोदिया म्हणाले. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी उत्तर देत दिल्ली सरकारला सुनावलं. दिल्लीच्या लोकांना संशयाची लस देऊ नका, असा टोलाही हर्ष वर्धन यांनी लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही लोक खोटी माहिती स्वीकारतात आणि खोटी माहिती पसरवतात, असं म्हणत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. या ट्विटवरून सिसोदिया यांनी भूमिका मांडत काही सवाल केले होते. मनिष सिसोदिया यांनी केलेल्या ट्विटनंतर हर्ष वर्धन यांनी पुन्हा ट्विटमधून त्याला उत्तर दिलं.

vaccination in india : लसीकरणाचा वेग मंदावला

काय म्हणाले होते मनिष सिसोदिया?

“डॉक्टर साहेब, २१ जूननंतर केंद्र सरकार दिल्लीसाठी लस पुरवणार आहे का की, दिल्ली सरकारने जी लस खरेदी केलेली आहे, तीच जूनमध्ये मिळणार आहे? जुलै महिन्यात दिल्लीला फक्त १५ लाख लसींचे डोसचा पुरवठा करणार आहेत? असं असेल, तर तुम्ही स्वतःच विचार करा या वेगाने लसीकरणासाठी आणखी १५-१६ महिने लागतील,” असं सिसोदिया म्हणाले होते.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन काय म्हणाले?

“दिल्लीच्या जनतेला संशयाची लस देऊ नका आणि मनाप्रमाणे आकडेमोड करून नका. जूनमध्ये दिल्ली सरकारने ५.६ लाख डोस खरेदी केले होते. त्याशिवाय केंद्राने खरेदी केलेल्या लस साठ्यातून ८.८ लाख अतिरिक्त लसींचे डोस मोफत पुरवण्यात आले आहेत आणि उर्वरित मागणी जून २०२१ च्या अखेरीपर्यंत पूर्ण केली जाईल,” असं उत्तर हर्ष वर्धन यांनी दिलं.

हेही वाचा- देशात संपूर्ण लसीकरणासाठी २०७ दिवस!

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारकडे उपलब्ध असलेल्या लस साठ्याची माहिती दिली. दिल्ली सरकारकडे सध्या ९.९ लाख डोस शिल्लक आहेत. २१ जूनपासून पुढे केंद्र सरकारने दिलेली लस असो वा राज्य सरकारने खरेदी केलेली, ती १८ वर्षांपुढील नागरिकांना देता येऊ शकते. लसीकरणावरून दिल्ली सरकार खोट्याचं राजकारण करत आहे. २१ जून रोजी दिल्ली सरकारकडे लसीचे ११ लाख डोस होते, पण दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणाताहेत की, लसच नाही,” अशी टीका हर्ष वर्धन यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccine shortage vaccination drive union health minister harsh vardhan manish sisodiya bmh