* ‘आप’ कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार
वाराणसीतील एका निवडणूक अधिकाऱयांने त्याला देण्यात आलेल्या मतदान यंत्रे (इव्हीएम) आपल्या घरी नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, घरी ‘इव्हीएम’ नेणाऱया या अधिकाऱयाच्या मुलानेच कुतुहलाने वडीलांनी आणलेल्या ‘इव्हीएम’चे छायाचित्र आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकले आणि काही काळातच ते सर्व ठिकाणी व्हायरल झाले. निवडणूक आयोगाच्या नजरेस ही गोष्ट आली असून संबंधित अधिकाऱयावर तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदाना दिवशी जर कुठे ‘इव्हीएम’ मध्ये बिघाड झाल्याची घटना घडताच त्याजागी नव्या ‘इव्हीएम’ उपलब्ध करून देता यावे यासाठी वाराणसीतील विभागीय लेखापरिक्षण अधिकारी ए.के.श्रीवास्तव यांना निवडणूक आयोगाने अतिरिक्त मशीन दिल्या होत्या. परंतु, कार्यालयात मशीन न ठेवता श्रीवास्तव यांनी त्या आपल्या घरी नेल्या आणि त्यांचा मुलगा गौरव यांने कुतुहलाने वडिलांनी आणलेल्या ‘इव्हीएम’चे छायाचित्र आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले. हे प्रकरण विभागातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.