संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी चार तरुणांनी घुसखोरी केली होती. यापैकी दोन तरुणांना लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीचे पास दिल्याबद्दल भाजपाचे म्हैसूर मधील खासदार प्रताप सिंह चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा प्रताप सिंह चर्चेत आहेत. म्हैसूल जिल्ह्यातील एका गावात सोमवारी (२२ जानेवारी) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी ते पोहोचले असताना त्यांना गावकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना म्हैसूरमधील गुज्जेगौडनापुरा गावात राम मंदिर उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. म्हैसूर जिल्ह्याच्या हरोहळ्ळी पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या या गावातील ग्रामस्थाने शिल्पकार अरुण योगीराज यांना रामलल्लाची मूर्ती कोरण्यासाठी एक मोठी शिळा दिली होती. अयोध्येत आज स्थापन झालेली रामलल्लाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनीच साकारली आहे.

रामलल्लाची मूर्ती घडवणारे अरुण योगीराज अयोध्येत पोहोचताच झाले भावुक; म्हणाले…

याच गावातील दलित शेतकरी रामदास एच. यांनी ही शिळा अरुण योगीराज यांना दिली होती. तसेच रामदास यांनी आपल्या जमिनीवर राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी गावाला दान केली आहे. याच जमिनीवरील मंदिराचा भूमिपूजन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता.

म्हैसूर लोकसभेचे खासदार प्रताप सिंह हे गावात होत असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना ग्रामस्थांनी त्यांचा विरोध केला. यावेळी माजी मंत्री एस. आर. महेश आणि स्थानिक आमदार जी. टी. देवेगौडा याठिकाणी उपस्थित होते.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार या गावातील एक तरुण शेतकरी सुरेश यांनी खासदार प्रताप सिंह यांना उद्देशून सांगितले, “तुम्ही मागच्या १० वर्षांत आमच्या गावात आला नाहीत आणि आज राजकीय फायद्यासाठी गावात पाऊल ठेवले आहे. भाजपाचे स्थानिक आमदार इथे आले आहेत. ज्यांनी आधीपासून आम्हाला सहकार्य केलेले आहे. पण तुम्ही आमचे म्हणणे कधीही ऐकलेले नाही. त्यामुळे तुम्ही इथे येऊ नका.”

Parliament Attack : “…म्हणून मी त्या तरुणांना प्रेक्षक गॅलरीचे व्हिजिटर पास दिले”, भाजपा खासदाराचं स्पष्टीकरण

तुम्ही दलितांच्या विरोधात, ग्रामस्थांचा आरोप

दलित शेतकरी रामदास यांचे चुलत भाऊ स्वामी हरोहळ्ळी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, “खासदारांच्या बाबतीत ग्रामस्थ नाराज आहेत. मागच्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी प्रताप सिंह यांनी आमच्या समाजाविरोधात आणि नेत्यांविरोधात विधान केले होते. त्यांच्या तक्रारीवरून आमच्या गावातील काही लोकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे खासदार दलितांच्या विरोधात आहेत, अशी भावना तयार झाली. त्यांनी आमच्या गावात येऊन आमची विचारपूस करण्याचीही तसदी कधी घेतली नाही. मात्र आता लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे ते इथे येत आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers shoo away bjp mp pratap simha from ram mandir event in mysuru karnataka kvg
First published on: 22-01-2024 at 16:27 IST