डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्याकडून कृतज्ञता
मुंबई : डॉक्टरांमुळेच करोनाविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. सर्व डॉक्टरांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले आहे. आजपर्यंत करोनाचा लढा लढलो ते डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे. पुढे देखील हे आव्हान पेलणार आहोत ते डॉक्टरांच्याच भक्कम साथीने असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. राज्य ही लढाई डॉक्टरांशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही. या कठीण काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेला डॉक्टरांनी जो मोलाचा आधार दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र सदैव कृतज्ञ राहील असेही ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधानांचे आज डॉक्टरांना संबोधन
नवी दिल्ली : राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी वैद्यकीय समुदायाला संबोधित करणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘करोनाशी लढण्यात सर्व डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांचा देशाला अभिमान आहे. १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त दुपारी ३ वाजता डॉक्टर समुदायाला संबोधित करणार आहे’, असे मोदी यांनी ट्विटरवर लिहिले.