America Visa : अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता अमेरिकन प्रशासनाने भारतीय विद्यार्थांना इशारा दिला आहे. अमेरिकन संस्थांमध्ये शिक्षण घेताना अभ्यासक्रम सोडला तर भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकता, असं अमेरिकन दूतावासाने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये, भारतातील अमेरिकन दूतावासाने विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन करण्यास आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी त्यांचा विद्यार्थी दर्जा कायम ठेवण्यास सांगितले.

“जर तुम्ही शैक्षणिक संस्थांना न कळवता अभ्यासक्रम सोडला, लेक्चर्सना बसला नाहीत किंवा तुमचा अभ्यासक्रम सोडला तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि भविष्यातील अमेरिकन व्हिसासाठी तुम्ही पात्रता गमावू शकता. तुमच्या व्हिसाच्या अटींचे नियमित पालन करा आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी तुमचा विद्यार्थी दर्जा कायम ठेवा”, असं पोस्टमध्ये म्हटले आहे.

X वरील मागील पोस्टमध्ये, दूतावासाने असा इशारा देखील दिला होता की जर एखादी व्यक्ती तुमच्या अधिकृत राहण्याच्या कालावधीपेक्षा जास्त काळ युनायटेड स्टेट्समध्ये राहिली तर तुम्हाला हद्दपार केले जाऊ शकते आणि भविष्यात युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करण्यावर कायमची बंदी येऊ शकते.”

साडेचार हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांना परवानगी नाकारली

स्थलांतरित आणि परदेशी नागरिकांवरील कारवाईचा एक भाग म्हणून, ट्रम्प प्रशासनाने ४,७०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची परवानगी रद्द केली आहे. कमी कालावधीत कोणतेही स्पष्टीकरण न देता ही परवानगी रद्द करण्यात आली. न्यायालयीन सुनावणीत, गृह सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी विद्यार्थी व्हिसा धारकांची नावे एफबीआय-संचालित डेटाबेसद्वारे चालवली आहेत.