Vladimir Putin asks officials to gather info over Russia nuclear tests after Donald trump remark : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी जर अमेरिकेने अणुचाचणी पुन्हा सुरू केल्या तर रशिया देखील त्याबाबत विचार करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका अणुचाचण्या पुन्हा सुरू करेल, असे विधान केल्यानंतर काही आठवड्यांनी पुतिन यांनी मॉस्कोमधील सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या संबंधित विधान केले आहे.
पुतिन यांनी रशियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालये आणि सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना या विषयावरील माहिती गोळा करण्याचे आणि अण्वस्त्र चाचण्यांच्या संभाव्य सुरुवातीच्या तयारीच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. न्यूज१८ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या स्टॅटेजिक न्यूक्लिअर फोर्सेसच्या जमीन, समुद्र आणि हवेतीस सज्जतेची आणि कमांड स्ट्रक्चरच्या चाचणीची पाहणी केली. “आपल्या न्यूक्लिअर डेटेरेंट (deterrent) फोर्सेसची तथाकथित अधुनिकता ही सर्वोच्च पातळीवर आहे,” असेही पुतिन यावेळी म्हणाले. इतकेच नाही तर ती इतर कोणत्याही न्यूक्लिअर पॉवरपेक्षा अधिक आहे, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दक्षिण कोरिया येथे भेटण्याच्या काही वेळ आधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, त्यांनी पेंटागॉनला समान आधारावर (on an equal basis) अणुचाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल.
“अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. माझ्या पहिल्या कार्यकाळात शस्त्रांचं संपूर्ण अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण यासह हे साध्य झालं. प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे मला ते करण्याचा तिरस्कार वाटला. पण पर्याय नव्हता! रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ५ वर्षांच्या आतच ते समान आधारावर येतील. इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे मी युद्ध विभागाला समान आधारावर आमच्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ती प्रक्रिया त्वरित सुरू होईल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.
विशेष बाब म्हणजे २१ व्या शतकात फक्त उत्तर कोरियानेच अणुचाचणी स्फोट केला आहे, ही चाचणी अखेरची २०१७ मध्ये करण्यात आली होती.
यादरम्यान दोन न्यूक्लिअर पॉवर्ड शस्त्रांची चाचणी घेणाऱ्या रशियावर अमेरिकेने लहान ‘लो-यील्ड’ चाचण्या केल्याचा आणि त्यांच्या न्यूक्लिअर प्रोग्रामबाबत पारदर्शकता न बाळगल्याचा आरोप केला आहे.
मात्र ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील अणुचाचणीसंबंधीत पोस्टमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, कारण त्यांनी केलेले विधान नेमके कशाबद्दल होते याबद्दल स्पष्टता नाही. ट्रम्प हे विधान न्यूक्लिअर वेपन डिलिव्हरी सिस्टम्सबद्दल केले की ३३ वर्षांची एक्सप्लोजिव्ह न्यूक्लिअर टेस्ट्सवरील स्थगिती संपुष्टात आणण्याबाबत हे स्पष्ट झालेले नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इतर देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत असा दावा पुन्हा एकदा केला. त्यांचा दावा आहे की पाकिस्तान, उत्तर कोरिया, चीन आणि रशिया हे देश गुप्तपणे भूमिगत अणुचाचण्या करत आहेत. आणि म्हणून अमेरिका देखील अणुचाचण्या सुरू करेल. सीबीएस 60 minutes मुलाखतीत, ट्रम्प यांनी पाकिस्तानसह इतर देश भूमिगत चाचण्या करत असल्याचा ठासून सांगितले.
“नाही, आम्ही चाचण्या करणार आहोत, कारण ते चाचण्या करतात आणि इतरही देश चाचण्या करत आहेत. आणि निश्चितच नॉर्थ कोरिया हा चाचण्या करत आला आहे. पाकिस्तानही चाचण्या करत आला आहे,” असे ट्रम्प म्हणाले. “तुम्हाला कदाचित ते कुठे चाचण्या करत आहेत हे माहिती नसेल. ते खूप खोलवर भूमिगत चाचण्या करतात, जिथे चाचणीमध्ये नक्की काय चालले आहे, हे लोकांना माहीत नसते,” असेही ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले.
