Putin confirms India visit: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणलेले आहेत. यादरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ते लवकरत भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची पुष्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी पुतिन हे या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात येणार असल्याची बातमी समोर आली होती. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना पुतिन यांनी ते या दौऱ्यासाठी आणि त्यांचे ‘प्रिय मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उत्सुक आसल्याचेही म्हटले आहे.
पुतिन म्हणाले की, “मी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार्या माझ्या दौऱ्यासाठी उत्सुक असून माझे प्रिय मित्र, आमचे विश्वासू भागीदार पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहात आहे.”
यापूर्वी पुतिन हे या वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या वार्षिक परिषदेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त समोर आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतर धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील सोव्हिएत काळातील संबंधावर देखील भाष्य केले, दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच मैत्रिपूर्ण संबंध राहिले असल्याचे पुतिन म्हणाले.
यावेळी पुतिन यांनी रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याकडून टाकण्यात आलेल्या दबावावर देखील भाष्य केले, यावेळी पुतिन यांनी अमेरिकेच्या दबावाला बळी न पडल्याबद्दल भारताचे कौतुक केले. तसेच त्यांनी भारत रशियावरील आपले ऊर्जेचे अवलंबित्व संपवणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
पुतिन नेमकं काय म्हणाले?
पुतिन यांनी स्पष्ट केले की रशियाबरोबर ऊर्जा व्यापार बंद केला किंवा सुरू ठेवलात तरी भारताचे नुकसानच होईल. “भारत आपले उर्जेचे स्त्रोत सोडून देईल का? जर तसे झाले तर नक्कीच काही नुकसान होईल. काहींच्या मते अंदाजानुसार ते ९ ते १० अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते. पण जर भारताने नकार दिला नाही (रशियन तेल खरेदीला) , तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील आणि नुकसान तेवढेच असेल. मग देशांतर्गत राजकीय किंमत मोजून नकार का द्यावा? ते (भारतीय लोक) कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा अपमान कधीही सहन करणार नाहीत. मी पंतप्रधान मोदींना ओळखतो, ते देखील असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, असे पुतिन म्हणाले.
पुतिन असेही म्हणाले की ते भारताबरोबरील व्यापारी असमतोल भरून काढण्याच्या दृष्टीने काम करतील आणि ते भारताकडून अधिक कृषी आणि वैद्यकीय उत्पादने विकत घेण्याची योजना आखत आहेत. ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापर शुल्काबद्दल बोलताना पुतिन म्हणाले की, “अमेरिकेने दंड म्हणून लादलेल्या टॅरिफमुळे भारताचे जे नुकसान झाले आहे ते रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीमुळे संतुलित होईल, याबरोबरच सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताला प्रतिष्ठा देखील मिळेल.”