Vladimir Putin Warning to US Donald Trump on Russia Ukraine War : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला युद्धात मदत करू पाहणाऱ्या अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. प्रामुख्याने अमेरिकेकडे रोख ठेवत पुतिन म्हणाले, “युक्रेनला रशियन भूमीवर हल्ला करण्यासाठी टॉमहॉक क्रूज क्षेपणास्रांसारखी दूरपर्यंत मारा करू शकतील अशी शस्त्रास्रे दिली गेली तर सर्वांना धक्का देईल असं प्रत्युत्तर रशियाकडून मिळेल.”

रशियन जिओग्राफिकल सोसायटीच्या १७ व्या बैठकीवेळी पुतिन यांनी केलेल्या भाषणातून अमेरिका, युक्रेन व युरोपीय राष्ट्रांना इशारा दिला आहे. तसेच ते म्हणाले, “एखादं जरी टॉमहॉक क्षेपणास्र रशियाच्या दिशेने आलं तर कोणीही कल्पना केली नसेल असं प्रत्युत्तर दिलं जाईल.”

व्लादिमीर पुतिन म्हणाले, “कुठलाही स्वाभिमानी देश परकीय दबावापुढे झुकणार नाही. रशियासारखा देश झुकण्याचा प्रश्नच नाही. दरम्यान, बुडापेस्ट येथे पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पुतिन यांच्यात बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द झाल्याचा दावा केला जात आहे. यावर पुतिन म्हणाले, सदर बैठक रद्द केलेली नाही. ही बैठक केवळ स्थगित करण्यात आली आहे.”

अमेरिकेने रशियातील दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांचा पुतिन यांच्याकडून निषेध

रशियाचे अध्यक्ष दोन्ही देशांमध्ये (रशिया व युक्रेन) पडद्यामागे चर्चा चालू ठेवण्याचे संकेत देत म्हणाले, “आम्हाला असं वाटतं की बाचतीत हे कुठल्याही वादापेक्षा किंवा युद्धापेक्षा उत्तम मार्ग आहे.” पुतिन यांनी अमेरिकेने रशियातील दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पुतिन म्हणाले, “हे निर्बंध लादून मॉस्कोवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असाल तरी रशिया अशा दबावाला जुमानत नाही. मॉस्को अशा दबावापुढे झुकणार नाही.”

…आमच्यावरील निर्बंधाच्या अमेरिकेलाही झळा बसतील : पुतिन

रशियाचे अध्यक्ष म्हणाले, “मी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आंना सांगितलं होतं की अशा निर्बंधांमुळे जागतिक ऊर्जा व्यापारावर गंभीर परिणाम होतील. यामुळे जागतिक बाजार अस्थिर होऊ शकतो आणि तेलाच्या किमती भडकू शकतात. याचा अमेरिकेलाही फटका बसेल. आम्ही अगदी स्पष्ट व थेट संदेश दिला होता की या निर्बंधांमुळे जगभरात तेलाच्या किमती वाढतील आणि अमेरिकाही त्यापासून वाचणार नाही.”