Vyomika Singh Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. तेव्हा भारतीय सैन्यातील दोन महिला अधिकारी देशाला याची माहिती देण्यासाठी पुढे आल्या होत्या. त्यापैकी एक होत्या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग, तर दुसऱ्या होत्या कर्नल सोफिया कुरेशी.

या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषदेतून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली. तेव्हा टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियावर त्यांच्या विषयी बरीच चर्चा झाली. त्यामुळे लोकांमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

व्योमिका सिंग यांनी दिल्लीतील सेंट अँथनीज सीनियर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी सेंट अँथनी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पर्यावरण अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

व्योम को छूने के लिए बनी हो

शाळेच्या शेवटच्या दिवशी व्योमिका सिंग शाळेच्या स्टाफरूमच्या बाहेर उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक ऑटोग्राफ बुक होतं, ज्यात शिक्षक विद्यार्थ्यांना निरोपाचे संदेश लिहितात. त्यांच्या हिंदीच्या शिक्षिका नीलम वासन यांनी त्या बुकमध्ये लिहिलं होतं, “व्योम को छूने के लिए बनी हो.” याचा अर्थ, “तुझा जन्म आकाशाला स्पर्श करण्यासाठी झाला आहे.” नीलम वासन म्हणतात की, त्यांना अजूनही तो दिवस स्पष्ट आठवतो, जेव्हा व्योमिका सिंग ऑटोग्राफसाठी त्यांच्याकडे आल्या होत्या.

उत्कृष्ट बास्केटबॉलपटू

व्योमिका सिंग यांच्याबाबत बोलताना ७० वर्षीय ज्योती बिष्ट म्हणाल्या, “व्योमिका हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये खूप चांगली होती.” ज्योती बिष्ट या अकरावी आणि बारावीमध्ये व्योमिका सिंग यांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, व्योमिका सिंग अभ्यासातच नव्हे तर बास्केटबॉलमध्येही उत्कृष्ट होत्या. त्याचबरोबर त्या वादविवाद स्पर्धांमध्येही खूप भाग घेत असत.

आठवीच्या वर्गात व्योमिका सिंग यांना शिकवणाऱ्या शिक्षिका मंजू साहनी म्हणतात की, व्योमिका सिंग यांनी त्यांच्या शाळेचे नाव उंचावले आहे.

तिला हवेत उडायचं होतं…

व्योमिका सिंग यांच्या बालपणीची मैत्रीण शालिनी रमण परक्कत सध्या बंगळुरूमध्ये राहतात. त्या एक कलाकार आहेत. जुन्या दिवसांची आठवण काढताना शालिनी म्हणाल्या, “ती (व्योमिका) नेहमी म्हणायची की ‘व्योम’ म्हणजे आकाश किंवा हवा, आणि तिला हवेत उडायचं होतं. त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत होतं की, ती एक दिवस नक्कीच पायलट किंवा वैमानिक अभियंता बनेल.”

एक चांगली मैत्रीण…

व्योमिका सिंग यांची दुसरी मैत्रीण सुरुची जैन म्हणतात की, व्योमिका सिंग आणि त्या एकाच शाळेत होत्या. सुरुची यांनी सांगितले की, त्या वसंत कुंज स्टॉपवरून बसमध्ये चढायच्या आणि व्योमिका एनसीईआरटी आयआयटी स्टॉपवरून. “आम्ही एकाच बाकावर बसायचो. ती प्रत्येक गोष्टीत अष्टपैलू होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती एक चांगली मैत्रीण होती”, असे सुरुची जैन यांनी सांगितले.