Western Army Commander Manoj Kumar Katiyar on Pakistan : भारताचे वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कटियार म्हणाले, “पाकिस्तानमध्ये भारताशी थेट लढण्याची क्षमता नसल्यामुळे तो पुन्हा एकदा पहलगामसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र, त्यांनी तसं केल्यास भारत पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरसारखी मोहीम राबवेल आणि यावेळी भारताचं प्रत्युत्तर अधिक भयंकर असेल.”
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी नुकतीच जम्मूमध्ये पत्रकारांशी बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात आम्ही त्यांच्या चौक्या, हवाई तळ आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. आपण चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी आपल्याला सतर्क राहावं लागेल कारण ते पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतात.”
“भारताची प्रत्युत्तरात्मक कारवाई अधिक व्यापक व मोठी असेल”
माजी लष्करी जवानांना संबोधित करताना वेस्टर्न आर्मी कमांडर म्हणाले, “पाकिस्तानने कुठलाही प्रयत्न केला तर भारताचं प्रत्युत्तर खूप भयंकर असेल. आपलं प्रत्युत्तर हे भयंकरच असलं पाहिजे. याबाबत कुठलीही शंका असू नये. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. मला विश्वास आहे की पाकिस्तानविरोधात भारताने यापूर्वी केलेल्या कारवायांपेक्षा यावेळी भारत अथिक मोठी व व्यापक कारवाई करेल.”
पाकिस्तान सुधारणार नाही : कटियार
“पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. तो त्याच्या दुष्ट कारवाया करत राहणार. कारण त्यांच्याकडे भारताशी थेट लढण्याची क्षमता व धाडस नाही. असं असलं तरी भारतीय लष्कर त्यांचे सगळे मनसुबे निष्फळ करण्यास सज्ज आहे. कारण आपल्याला आपल्या जनतेचा पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपण पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं होतं. त्यावेळी देखील भारतीय सैन्याला लोकांचा आणि प्रामुख्याने माजी सैनिकांचा पाठिंबा होता.”
२२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. त्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. त्यानंतर भारताच्या सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेतली. यावेळी भारतीय वायूदलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले.