What is Digital Arrest: एवढी शिकलेली माणसं कशी फसवली जातात? फक्त एक फोन किंवा व्हिडीओ कॉल येतो आणि लोक आपली सगळी माहिती त्यांना कशी देतात? इतके पैसे नेमके जातात कुठे? बँक खात्यांमधून कसे आणि कुठे फिरवले जातात पैसे? इतक्या लोकांची फसवणूक करूनही ही मंडळी मोकाट फिरतात कशी? तपास यंत्रणा यांच्यापर्यंत पोहचण्यात अपयशी कशा ठरतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. आधी ऑनलाईन आणि आता फोन किंवा व्हिडीओ कॉलवर अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण हे सगळं नेमकं कसं घडतं? याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नं यासंदर्भात सविस्तर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तयार केला असून त्यातून हे संपूर्ण नेटवर्क कसं काम करतं? याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यासाठी हरियाणाच्या गुरग्राममध्ये घडलेलं एक ६ कोटींच्या Digital Arrest चं प्रकरण तपासून त्यातील सर्व धागेदोरे उघड करण्यात आले आहेत. त्यातून नॅशनल कॅपिटल रीजन अर्थात दिल्ली एनसीआरमधील एका आलिशान कॉर्पोरेट परिसरातून हरियाणातील एका छोट्या तीन खोल्यांच्या घरापर्यंत आणि तिथून हैदराबादमधील एका इमारतीच्या छतावरच्या एका छोट्याशा खोलीपर्यंत हा स्कॅम कसा अंमलात आला, याचा खुलासा झाला आहे.

अवघ्या काही मिनिटांत ६ कोटी गायब झाले!

दिल्ली एनसीआर ते हैदराबादमधली छोटीशी खोली आणि तिथून पुढे १५ राज्यांमध्ये झालेले पैशांचे ट्रान्झॅक्शन यात तब्बल ६ कोटी लुटले गेले. आणि हे करायला अवघी काही मिनिटं पुरेशी ठरली. काही क्षणांत हा सगळा पैसा या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात पसरलेल्या तब्बल २८ बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आला. हे इथेच थांबलं नाही, तर तिथून पुढे पुन्हा १४१ खात्यांमध्ये तो ट्रान्झॅक्ट झाला आणि त्यानंतर ६ कोटींमधला छदामही या नेटवर्कमध्ये अस्तित्वात राहिला नाही.

कसं फसवलं जातं, काय घडतं तुम्हीच पाहा

भारतात फक्त २०२४ मध्ये गुरग्रामसारखी जवळपास १ लाख २३ हजार प्रकरणं असून त्यात तब्बल १ हजार ९३५ कोटी इतक्या पैशांचा घोटाळा झाला आहे. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत तब्बल तिप्पट आहे! या सर्व प्रकरणांमध्ये खोटी चौकशी, तपास व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पीडित व्यक्तींना फसवल्याचं समोर आलं आहे.

अल्प उत्पन्न खातेधारकांचा वापर

पैशांचे हे सर्व व्यवहार करण्यासाठी काही अल्प उत्पन्न खातेधारकांच्या खात्यांचा वापर करण्यात आला. २ लाख ते ८१ लाखांपर्यंतची रक्कम एकीकडून दुसरीकडे वळवण्यासाठी या खातेधारकांचा वापर केला गेला. याशिवाय, या सर्व व्यवहारांवर देखरेख ठेवणारी वेगळी माणसं होती. पीडितांवर दबाव टाकून हे सर्व प्रकरण झाकण्यासाठी काही बँकेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश या टोळीत करण्यात आला होता. गुरग्राम प्रकरणातील पीडित व्यक्तीने यासंदर्भातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

पीडित महिलेनं अनेक संस्थांकडे तक्रारी केल्या. पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं. या प्रकरणाचा तपास गुरुग्राम पोलिसांची एसआयटी करत आहे. एसआयटीनं आत्तापर्यंत या प्रकरणात हैदराबादमधील तिघांना अटक केली आहे. त्यात एका कोऑपरेटिव्ह बँकेचा एक संचालक समुद्रला आणि के वीरभद्र राव व जे जॉन वेसलरी या त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आत्तापर्यंत या पथकाने ५८ लाख रुपये हस्तगत केले आहेत.

“या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून सगळ्यांनीच मला विचारलं, तुमच्यासारखी एक सुशिक्षित महिला अशी चूक कशी करू शकते? अशा प्रकारे प्रत्येक पीडित व्यक्तीला आणखी खजील केलं जातं, त्याच्यावर मानसिक दडपण वाढवलं जातं. जेणेकरून जे काही घडलं, त्याबद्दल आम्ही कुठे काही बोलूच नये. लुटणाऱ्या व्यक्तींना हेच तर हवं असतं”, असं पीडित महिलेनं सांगितलं.

५.८५ कोटी.. १४१ खाती.. ३ टप्प्यात गायब!

४-५ सप्टेंबर २०२४: पोलिसांच्या नोंदींनुसार, पीडित महिलेने नजीकच्या एचडीएफसी बँकेत जाऊन फोनवरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ९९ लाख प्रत्येकी अशा स्वरूपात ५ कोटी ८५ लाख रुपये आरटीजीएस पद्धतीने ट्रान्सफर केले. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील सुबना गावात राहणाऱ्या पियूषच्या नावावरील ICICI बँकेत ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली.

४ सप्टेंबर २०२४: दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते २ वाजून ४७ मिनिटे या दोन मिनिटांत पियूषच्या खात्यात पीडित महिलेनं ट्रान्सफर केलेले २ कोटी ८८ लाख रुपये जमा झाल्याची नोंद झाली. २ वाजून ५२ मिनिटांनी त्याच्या खात्यातून इतर १० बँकांमधल्या २८ खात्यांमध्ये ही रक्कम ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. पुढच्या १ तास २८ मिनिटांत संपूर्ण २ कोटी ८८ लाखांची रक्कम इतरत्र ट्रान्सफर झाली होती!

५ सप्टेंबर २०२४: दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पियूषच्या खात्यात पीडित महिलेनं ट्रान्सफर केलेले आणखी २ कोटी ९७ लाख जमा झाले. पुढच्या ३५ सेकंदांत त्याच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर होऊ लागली. पुढच्या २९ मिनिटांत ही सर्व रक्कम त्याच्या खात्यातून ट्रान्सफर झाली होती. २६ वर्षीय बेरोजगार पियूषच्या खात्यात आता फक्त २८४४ रुपये शिल्लक होते.

पियूषचे ६० वर्षीय वडील आणि माजी सैनिक रणबीर यांनी हताश होऊन सगळी कहाणी कथन केली. पियूषला अटक करून सहा महिने भोंडसी तुरुंगात ठेवलं होतं. या वर्षी ८ एप्रिलला त्याला जामीन मिळाला आणि आता तो दुसऱ्या एका ठिकाणी एका नातेवाईकासोबत राहात आहे.
रणबीर आणि त्यांची पत्नी शकुंतला यांचे मुलाबाबत बोलताना डोळे भरून आले होते. आपल्या मुलाला त्याच्या मित्रांनी हे बँकेतलं खातं उघडण्यासाठी दबाव आणला होता असं ते सांगतात. “हे करण्यासाठी त्याला बदल्यात काहीच मिळालं नाही. जेव्हा ५ सप्टेंबरला बँकेची माणसं आमच्या घरी आली, तेव्हाच आम्हाला ही घोटाळ्याची रक्कम खात्यात झाल्याबाबत समजलं”, असं रणबीर म्हणाले.

फसवणुकीचा ‘सुपर-वे’.. हरियाणा ते थेट हैदराबाद!

पोलिसांनी केलेल्या नोंदींनुसार, पियूषच्या खात्यातून ट्रान्सफर केलेल्या पैशांपैकी बहुतांश रक्कम ही आंध्र व तेलंगणामधील बँक खात्यांमध्ये जमा झाली. यात हैदराबादच्या सरूर नगरमधील श्रीनिवासा पद्मावती कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेतील ११ खात्यांमध्ये जमा झालेल्या ४ कोटी ८७ लाख रुपयांचाही समावे आहे. या बँकेची एकूण कर्मचारी संख्या आहे अवघी १०!

या ११ खात्यांपैकी ५ खाती ही बँकेचे एक संचालक वेंकटेश्वरालू समुद्रला यांच्या नावावर असल्याचं तपासात निष्पन्न झालं. शिवाय, ही खाती उघडण्यासाठी अर्जात नमूद करण्यात आलेल्या पत्त्यांपैकी बहुतांश पत्ते हे खोटे असल्याचंही स्पष्ट झालं. यात फक्त तीन खाती ही खऱ्या पत्त्यांवरील खऱ्या व्यक्तींची होती. त्यात एक टेलर, एक कारपेंटर आणि एका ऑटोरिक्षाचालकाचा समावेश होता. या तिघांचीही एसआयटीनं चौकशी केली आहे.

यात अंबरपेट परिसरात राहणाऱ्या व पेशानं टेलर असणाऱ्या ३५ वर्षीय आर. शारदा एकट्या मेहनत करून दोन मुलींचा सांभाळ करत आहेत. दुसरं खातं आहे सैदाबाद परिसरातील रेड्डी बस्तीत राहणारे ४५ वर्षीय कारपेंटर एन. रवींदर यांच्या नावावर. बँकेचा संचालक समुद्रला या दोघांशी फक्त फोनवर संवाद साधायचा, असंही या दोघांनी सांगितलं. समुद्रलानंच या दोघांना बँकेत खातं उघडण्याची गळ घातली होती.

Digital Arrest शी संबंधित कारवाया व इतर प्रकरणे…

वर्षप्रकरणांची संख्याघोटाळ्याची रक्कम
२०२२३९,९२५९१.१४ कोटी
२०२३६०,६७३३३९.०३ कोटी
२०२४१,२३,६७२१९३५.५१ कोटी
२०२५ (फेब्रुवारीपर्यंत)१७७१८२१०.२१ कोटी
राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री बांदी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार…

खातेधारकांनी कधी खातं वापरलंच नाही!

रवींदरच्या खात्यातील गैरप्रकाराबद्दल आय ४ सी कलमानुसार एकूण ३७ तक्रारी दाखल आहेत. याच्यापेक्षा जास्त तक्रारी चंपापेटच्या भानू नगर परिसरातील रहिवासी साई कृष्ण कंदी यांच्या नावावर असलेल्या खात्यासंदर्भात दाखल आहेत! शारदा यांच्या खात्यावर अशा ८ तक्रारी दाखल आहेत. शारदा किंवा रवींदर या दोघांनाही अशा काही तक्रारी त्यांच्या खात्यासंदर्भात दाखल आहेत याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती.

गुरग्राममधील या प्रकरणातली ११ बनावट खाती अशाच प्रकारच्या इतर १८१ आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातही वापरण्यात आल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. या ११ खात्यांचा वापर करून ३ महिन्यांत तब्बल २१ कोटी रुपये इतर खात्यांमध्ये वळवण्यात आले आहेत. नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, यातील काही पैसा क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठीही वापरण्यात आला आहे.

कंदीच्या नावे असणाऱ्या खात्यावर अशा तब्बल ४६ तक्रारी दाखल आहेत. पण याच खात्यात पियूषच्या खात्यातून वळवण्यात आलेली सर्वाधिक रक्कम म्हणजेच ८१ लाख ४० हजार जमा झाली होती. गेल्या ११ महिन्यांत या खात्यावर एकूण ५ कोटी २४ लाख रुपये जमा झाल्याचं स्टेटमेंटवरून स्पष्ट होत आहे. पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या खात्यामध्ये बॅलेन्स होता फक्त ६ हजार रुपये! पण कंदीच्या खात्यासाठीचा पत्ता खोटा होता. त्यामुळे त्याचा शोध घेणं अशक्य झालं.

शारदाच्या खात्यात सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यां १ कोटी ६० हजार रुपये जमा झाले. ऑक्टोबर २०२४ पर्यंत ते सर्व काढून घेण्यात आले व खात्यात फक्त ६ हजार रुपये शिल्लक राहिले. या १ कोटी ६० हजारपैकी ४१ लाख रुपये हे पियूषच्या खात्यातून वळवलेल्या रकमेपैकी होते.

Digital Arrest म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार पीडितांना कॉल करून सांगतात की, त्यांना बेकायदा वस्तू, ड्रग्ज, बनावट पासपोर्ट अशा वस्तू कुरीअरने पाठवल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये मित्र, भाऊ किंवा बहीण एखाद्या गुन्ह्यात किंवा अपघातात सापडल्याचे दावे केले जातात. यासाठी पोलिसांची छायाचित्रे व ओळखपत्रांचादेखील वापर केला जातो. प्रकरण मिटवण्यासाठी नातेवाईक पैशांची मागणी केली जाते. काही प्रकरणांमध्ये पीडितांना स्काईप कॉलवरदेखील जोडले जाते. त्यासाठी सायबर गुन्हेगार पोलिस स्थानक किंवा सरकारी कार्यालयांसारखे दिसणारे स्टुडिओ तयार करतात आणि पोलिसांचे गणवेश घालून बसतात. जोपर्यंत त्यांना पैसे पाठवले जात नाही, तोपर्यंत ते तुम्हाला कॉलच्या बाहेर पडू देत नाहीत.

“मी सर्वप्रथम समुद्रला यांना एका बसमध्ये भेटले. त्यांनी मला नोकरी हवी का विचारलं. मला नोकरीची गरज होती. मी लगेच हो म्हणाले. त्यानंतर त्यांनी मला बँकेत एक खातं उघडायला लावलं. मी कधीच ते खातं वापरलं नाही किंवा बँकेतही गेले नाही. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी मला सांगितलं की समुद्रलानं माझ्या खात्याचा वापर करून घोटाळा केला आहे. मग मी हैदराबादमधील त्याच्या घरी पोलिसांना घेऊन गेले”, असं शारदा यांनी सांगितलं. शारदा हैदराबादमधील एका इमारतीच्या टेरेसवरील एका भाड्याच्या खोलीत टेलरिंग मशीन चालवून आपला उदरनिर्वाह करतात.

शारदाप्रमाणेच पेशानं कारपेंटर असणाऱ्या रवींदर यांच्या खात्यातूनही पियूषच्या खात्यातून आलेले १० लाख रुपये नंतर ट्रान्सफर करण्यात आले होते. “मी समुद्रलाला बँकेबाहेरच्या एका चहाच्या टपरीवर भेटलो होतो. त्यानं मला काम देऊ केलं. त्या नोकरीसाठी बँकेत खातं उघडणं गरजेचं असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मला पुराव्यांनिशी हजर व्हायला सांगितलं. माझ्या कुटुंबाला पोसण्यासाठी मी दिवसभर मेहनत करतो. मी काहीही चुकीचं केलेलं नाही”, असं रवींदरनं सांगितलं. रवींदर एका भाड्याच्या घरात त्यांची पत्नी व ५ वर्षांच्या मुलासह राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रलावर याआधी क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गुजरातमध्ये त्याला अशाच एका प्रकरणात सप्टेंबर २०२४ मध्ये अटक झाली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात त्याला साबरमती जेलमधून राजकोट सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं होतं.