Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते. एवढंच नाही तर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांची महत्वाची भूमिका राहिली. पण काही दिवसांपूर्वीच ते ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. तेव्हापासून इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे एकमेकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यात दुरावा आला असून दोघांमधील मतभेद आता समोर आले आहेत. यावरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.

इलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाच्या एका नव्या विधेयकांवर नाराजी व्यक्त एक मोठं विधान केलं होतं. “माझ्याशिवाय ट्रम्प निवडून आले नसते”, असं मस्क यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रत्युत्तर देत मस्क यांचे सरकारी अनुदान आणि करार रद्द करण्याची धमकीच दिली. एवढंच नाही तर यापुढे आपल्याला मस्क यांच्याशी बोलण्यात विशेष स्वारस्य नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

इलॉन मस्क यांनी नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला आहे. त्यामध्ये मस्क यांनी असं म्हटलं आहे की, “अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?” असं म्हटलं आहे. तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत द अमेरिका पार्टी असं सूचक नवीन नावही त्यांनी त्यात सूचवलं आहे. इलॉन मस्क यांच्या या पोस्टमुळे ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या विचारात आहेत का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

“…तर ट्रम्प निवडणूक हरले असते”, इलॉन मस्क

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की,“माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळालं असतं”, त्यांच्या या विधानानंतर अमेरिकत मोठी चर्चा रंगली होती.

डोनाल्ड ट्रम्प मस्क यांच्याशी चर्चा करण्यासही अनुत्सुक

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात दुरावा आला आहे. इलॉन मस्क हे ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर या दोघांमधील मतभेद आता जाहीर झाले आहेत. यादरम्यान आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मस्क याच्याबरोबर चर्चा करण्यासही अनुत्सुकता दाखवली आहे. ट्रम्प यांनी आपल्याला मस्क यांच्याशी बोलण्यात विशेष स्वारस्य नाही असं म्हटलं आहे. तसेच “तुम्ही तो व्यक्ती म्हणताय का ज्याचे डोके ठिकाणावर नाही?” असंही ट्रम्प यांनी म्हटलं.