हासन (कर्नाटक) : कर्नाटकातील आधीच्या भाजप सरकारच्या काळात घडलेले सर्व कथित घोटाळे आणि अनियमितता यांची चौकशी केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारच्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी हे वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोम्मई सरकारच्या काळात चार वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आणि त्यामध्ये अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. तसेच ४० टक्के दलालीच्या आरोपांचीही चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोविडकाळात प्राणवायूचा पुरवठा कमी पडल्यामुळे चामराजनगर रुग्णालयामध्ये रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यासंदर्भात तत्कालीन आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी खोटी माहिती दिली होती असा आरोप करून, त्याची चौकशी केली जाईल असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळय़ाची चौकशी सीआयडीतर्फे सुरू आहे. ती वेगाने केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल असे ते म्हणाले. कोविड-१९ कालावधीत आरोग्याशी संबंधित झालेल्या खरेदीमधील अनियमितता, सिंचन प्रकल्पांशी संबंधित अनियमितता आणि बिटकॉइन घोटाळे या सर्वाची चौकशी केली जाईल असे सिद्धरामय्या यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले. तसेच पाच हमी योजना राबवण्यासाठी सरकार वर्षांला ५९ हजार कोटी खर्च करेल असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will probe all scams irregularities during previous bjp government zws