Free Sanitary Napkins For School Girls : शाळेतील विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावे, याकरता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एकसमान राष्ट्रीय धोरण आखण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, या राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दिली. इयत्ता ६ ते बारावीतील विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, नॅपकिन्सची विल्हेवाट आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या मागणीकरता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना केंद्राने ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. केंद्राने या धोरणाबाबत लोकांचं मत जाणून घेण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी मागितला आहे, असे वृत्त लाईव्ह लॉ या कायदेशीर वृत्त देणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे.

“शालेय मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सच्या वितरणासाठी पाळल्या जाणार्‍या पद्धतींमध्ये एकसमानता आणणे, पुरेशा स्वच्छता सुविधा आणि अधिक स्वच्छतागृहांची खात्री या धोरणामध्ये करावी”, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिल्या आहेत.

ते म्हणाले की, पुढील सुनावणीत या धोरणाविषयी माहिती दिली जावी. तामिळनाडूमध्ये प्रत्येकी ६ नॅपकिन्स असलेली १८ पाकिटे दिली जातात. मात्र, हे देखील मुलींसाठी अपुरे आहेत. तसंच, सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरेसा पुरवठा आणि वितरणासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारशी समन्वय साधावा, अशीही सूचना दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will school students get free sanitary napkins important information of the center in the supreme court sgk