Premium

Wrestlers Protest : “कुस्तीगीरांनी असं कुठलंही पाऊल…” केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा सल्ला

अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगीरांना काय सल्ला दिला आहे?

What Anurag Thakur Said?
अनुराग ठाकूर यांचा कुस्तीपटूंना सल्ला (फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)

Wrestlers Protest: बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीगीरांनी आंदोलन पुकारलं आहे. २८ मे रोजी या सगळ्या कुस्तीगीरांना जंतरमंतर या ठिकाणाहून हटवण्यात आलं. त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र नंतर सोडून दिलं. यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आता या सगळ्या घटनांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे आहे अनुराग ठाकूर यांनी?

“कुस्तीगीरांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी सरकारने खेळांसाठीचं बजेट ८७४ कोटींवरून २७८२ कोटींवर नेलं आहे. खेलो इंडिया सारख्या योजना आणल्या आहेत. टॉप सारख्या मंचाच्या माध्यमातून अनेकांना संधी मिळाली आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणावरही कोट्यवधींचा खर्च केला जातो. खेळाडूंच्या प्रशिक्षणात कुठलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही. आम्ही जे करतो आहोत ते खेळाडूंची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त करत आहोत असा आमचा प्रयत्न आहे. अशात काही रेसलर्स ही मागणी करत आहेत की त्यांचा छळ झाला त्यानंतर आम्ही तातडीने कमिटी स्थापन केली. ही कमिटी आम्ही त्याच्याशी चर्चा करुन स्थापन केली आहे. रात्री दोन वाजता घोषणा केली. त्यांनी सांगितलेल्या सदस्यांना आम्ही घेतलं. कमिटीने निष्पक्षपातीपणाने चौकशी केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली. सर्वोच्च न्यायालयातही प्रकरण गेलं. ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या केल्या. आम्ही आमच्याकडून कमी पडलो नाही.

जेव्हा आरोप होतात तेव्हा चौकशी होते चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट बघा

कुस्तीगीरांचं सगळं म्हणणं आम्ही ऐकलं. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तुम्ही ७५ वर्षांचा इतिहास पाहा, जेव्हा असे आरोप होतात तेव्हा चौकशी होते. चौकशी होईपर्यंत वाट बघा. जर तुम्हाला वाटलं तर नंतर आंदोलन करा. मात्र तुम्हाला पोलीस, सर्वोच्च न्यायालय, समिती यापैकी कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. आम्हालाही वाटतं आहे की जो मुद्दा समोर आलाय त्याची निष्पक्षपणे चौकशी केली जावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र कुस्तीगीरांनी असं कुठलंच पाऊल उचलायला नको की ज्यामुळे इतर खेळाडूंना त्रास होईल.” असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे बृजभूषण शरण सिंह?

“माझ्यावर आरोप झालेत त्याचा एक तरी पुरावा द्या. मी कुणासोबत चुकीचं वर्तन केलं? कधी केलं ते सांगा. मी आधीही सांगितलं होतं मी आजही सांगतो आहे. माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला तर त्यादिवशी मी स्वतः फाशी घेईन. कुणाला काही सांगायची गरज लागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. चार महिने झाले आहेत. कुस्तीगीर महिलांचं म्हणणं आहे मला फाशी झाली पाहिजे. सरकार मला शिक्षा देत नाहीये तर आपली मेडल्स घेऊन गंगा नदीत विसर्जन करायला कुस्तीगीर गेले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी दिली जाणार नाही. तुमच्याकडे कुठलाही पुरावा आहे तर तो पोलिसांना आणि न्यायालयाला द्या. न्यायालयाने मला फाशी दिली तर मी फासावर जायलाही तयार आहे. हा इमोशनल ड्रामा करु नका. ” असं उत्तर बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 17:35 IST
Next Story
ChatGpt च्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये केली कॉपी ,कमवले १ कोटींहून अधिक रुपये; नेमकं काय केलं?