वृत्तसंस्था, बीजिंग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी दोन्ही देशांदरम्यान भागीदारीचे नवीन युग सुरू करण्याची निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी अमेरिका अजूनही शीतयुद्धाच्या मानसिकतेमधून जगभरात गोंधळाची बीजे पेरत असल्याची टीका केली.

पाचव्यांदा राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आल्यानंतर पुतिन यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी चीनची निवड केली आहे. ते दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी गुरुवारी पोहोचले. यावेळी जिनपिंग यांनी पुतिन यांचे बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’च्या बाहेर लाल गालिच्यावर स्वागत केले. तियान्मिन चौकात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या सैनिकांनी त्यांना सलामी दिली.

पुतिन यांचे स्वागत करताना जिनपिंग म्हणाले की, चीन-रशिया राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापनदिन साजरा करणे ही महत्त्वाची बाब आहे. ‘‘तीन चतुर्थांश शतक आमची मैत्री टिकल्यानंतर, चीन-रशिया संबंध अनेक चढउतारांनंतरही अधिकाधिक मजबूत झाले आहेत, तसेच बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितींच्या चाचणीतही खरे ठरले आहेत,’’ असे जिनपिंग यांनी पुतिन यांच्या भेटीदरम्यान सांगितले. पुतिन आपले जवळचे मित्र असल्याचे जिनपिंग यांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा पंतप्रधान निवडा- मोदी

रशिया आणि चीन यांचे मैत्रीपूर्ण संबंध जागतिक स्थैर्यासाठी एक महत्त्वाचा घटक असून इतर देशांपुढे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे असा विश्वास चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी व्यक्त केले.

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा उल्लेख न करता जिनपिंग यांनी नमूद केले की, ‘‘आमच्या राजनैतिक संबंधांनी महत्त्वाच्या आणि शेजारील देशांनी एकमेकांशी आदर व प्रांजळपणाने वर्तन कसे करावे आणि मैत्री व परस्पर लाभ कायम ठेवावा याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे’’.

पुतिन यांनीही आपल्या भाषणात जिनपिंग यांचा उल्लेख प्रिय मित्र असा केला. रशिया आणि चीनदरम्यानचे संबंध संधीसाधू आणि कोणाच्याही विरोधात नाहीत असे ते म्हणाले. जागतिक घडामोडींमधील आमचे सहकार्य आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक महत्त्वाचा स्थैर्य घटक म्हणून काम करतो असा दावा पुतिन यांनी केला. दोन्ही देश विविध राष्ट्रगटांचे सदस्य असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

चीन-रशिया संबंधांचा स्थिर विकास हा केवळ दोन देशांच्या आणि दोन व्यक्तींच्या मूलभूत हिताचा नाही तर प्रादेशिक आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी पोषक आहे. – क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन

युरोप व आशियाई क्षेत्रामध्ये सुसंवादाने एकीकरण प्रक्रिया साधण्याचा, युरोप व आशिया तसेच बीआरआयच्या आर्थिक क्षमता एकत्र आणण्याचा आमचा निर्धार आहे. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xi jinping vladimir putin sign deal over russia china partnership zws