Yogi Adityanath १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो आहे, यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर टीकेचे बाण चालवले आहेत. १९४७ ला फाळणीचं आणि लांगुलचालनाचं राजकारण काँग्रेसने केलं. १९४७ ला झालेली देशाची फाळणी हा भारताच्या राजकीय इतिहासातला तो काळा अध्याय आहे ज्यामुळे सनातन भारताची एकता धुळीस मिळाली, तारतार झाली. आपल्या देशाला फाळणीमुळे वेदनेचे घाव सहन करावे लागले.
योगी आदित्यनाथ आणखी काय म्हणाले?
१४ ऑगस्ट १९४७ मध्ये घडलेली फाळणी आठवून आज संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. विभाजन विभीषिका स्मृती दिवस सुरु करण्याचं श्रेय जातं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना. या दिवसामुळे फाळणीच्या जखमा काय होत्या ते लोकांना समजतं आहे. शरण आलेल्या नागरिकांचं पुनर्वसन आणि त्यांना इथे राहण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी CAA आणलं ही बाब कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक विस्थापितांना, स्थलांतरितांना नागरिकता मिळाली. काँग्रेसने स्थलांतरित आणि विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
फाळणीतल्या पीडितांना मी आदरांजली अर्पण करतो-योगी आदित्यनाथ
फाळणीनंतर जो नरसंहार झाला त्यातल्या पीडितांना मी आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यांसह आम्ही आहोत. तसंच जे विस्थापित आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, आपल्या देशातील अनेक क्रांतिकरकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्राण पणाला लावले. मात्र काँग्रेसने सत्तेची हाव असल्याने देशाची फाळणी मंजूर केली. काँग्रेसच्या त्या वेळच्या स्वार्थी आणि सत्तालोलुप धोरणामुळे पाकिस्तानमधल्या लाहोर, कराची, रावळपिंडी, मुलतान या ठिकाणी हिंदू, शिख बांधव आणि बौद्ध समाज यांचा सफाया झाला.
फाळणी हा देशाच्या इतिहासातला काळा अध्याय-योगी आदित्यनाथ
पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले, फाळणीनंतर जो हिंसाचार झाला त्यात १५ ते २० लाख लोकांचा मृत्यू झाला. तर एक कोटीहून अधिक लोक विस्थापित झाले. देशाच्या इतिहासातला फाळणी हा सर्वात काळा अध्याय आहे. अनेकांना आपलं वडिलोपार्जित घर सोडावं लागलं. हिंदू, शिख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन समुदायाला बलिदान द्यावं लागलं, पण त्यांच्यासाठी कुठलं स्मारकही काँग्रेसने उभारलं नाही. त्यांची वेदना पुढील पिढ्यांच्या विस्मृतीत कशी जाईल यावरच काँग्रेसने भर दिला असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.