Dalit Woman Assault Gujarat Garba Event: समानता समाजातील तळागाळात पोहोचली असल्याचे सांगितले जात असले तरी भारतात अद्यापही जातीवरून अन्याय होण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याच्या बातम्या येतात. नवरात्रोत्सवानिमित्त देशभरात आद्यशक्तीचा जागर होत असताना गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात मात्र एका दलित तरूणीवर इतर महिलांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ‘तू आमच्या बरोबरीची नाहीस, आमच्या गरब्यात येऊ नको’, असे सांगून या महिलांनी सदर तरूणीच्या केसांना ओढून बाहेर काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी चार महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
महिसागर जिल्ह्यातील वीरपूर तालुक्यातील भरोडी गावात सदर घटना शुक्रवारी घडली होती. गांधीनगर येथील सरकारी अभियंता महाविद्यालयात चौथ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या रिंकू वनकर (२५) तरूणीच्या तक्रारीनंतर वीरपूर पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एफआयआरमधील तक्रारीनुसार, तक्रारदार तरूणी तिच्या मैत्रिणीसह गावातील गरबा कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा लोमा पटेल, रोशनी पटेल आणि वृष्टी पटेल यांनी रिंकू वनकरला अडवले. दोन्ही गटात बाचाबाची झाल्यानंतर इतर महिलांनी रिंकूला म्हटले, “तुमचे लोक आमच्याशी बरोबरी करू शकत नाहीत. तुम्ही आमच्याबरोबर गरबा खेळू नका.”
महिलांबरोबर वाद झाल्यानंतर तक्रारदार रिंकूने गरब्याच्या ठिकाणची साऊंट सिस्टिम बंद केली आणि तेथील आयोजक प्रवीण ठाकोर यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. पण त्याचवेळी वर उल्लेख केलेल्या तीन महिला तिथे आल्या आणि त्यांनी तक्रारदाराला मारहाण केली, अशी माहिती एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे.
केसांना ओढून बाहेर काढले
तक्रारदार रिंकूने म्हटले की, त्या महिलांनी तिच्या केसाला धरून बाहेर ओढले. तसेच या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता इतरांनी तिला धरून चित्रीकरण करू दिले नाही. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ तर दिलीच. त्याशिवाय पुन्हा गरब्यात पाऊल ठेवला तर याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असेही सांगितल्याचे रिंकूने तक्रारीत म्हटले.
पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), कलम ५४, कलम ३५१ (१) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच अनुसूचित जाती/जमाती कायद्या अंतर्गत ॲट्रोसिटीचाही गुन्हा दाखल केला.