वृत्तसंस्था, पाटणा
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या वर्षभर आधीपासून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनसुराज पक्षाच्या खात्यात शून्य जागांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्या तुलनेत पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर बऱ्याच आधी निवडणुकीच्या तयारीला लागले होते. निवडणुकीच्या वर्षभर आधी त्यांनी राज्यव्यापी पदयात्रा काढली होती. त्यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते.
‘जनसुराज’ने राज्यातील २४३पैकी २३९ जागा लढवल्या. त्यापैकी एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. बहुसंख्य मतदारसंघांमध्ये या पक्षाच्या उमेदवारांना १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. चनपटिया येथे त्रिपुरारी कुमार तिवारी उर्फ मनिष कश्यप आणि जोकहित येथे सर्फराज आलम अशा मोजक्या उमेदवारांनीच १० टक्क्यांचा आकडा ओलांडला. काही ठिकाणी ‘नोटा’ला पडलेली मते ‘जनसुराज’पेक्षा जास्त आहेत. फोर्ब्जगंज येथे जनसुराजच्या मोहम्मद इक्रामुल हक यांना ७८९ मते मिळाली, त्या मतदारसंघात २,२५३ जणांनी नोटाला पसंती दिली.
‘‘या कामगिरीचा गांभीर्याने आढावा घेतला जाईल,’’ असे पक्षाचे प्रवक्ते पवन के. वर्मा यांनी निकाल स्पष्ट झाल्यानंतर जाहीर केले. पक्षाची स्थापना करताना ‘लोकशाही बळकट करणे, विकासाची ब्लूप्रिंट तयार करणे आणि बिहारचे नवीन भविष्य लिहिणे,’ अशी महत्त्वाकांक्षी ध्येयधोरणे जाहीर करण्यात आली होती.
पदयात्रेचा परिणाम ‘शून्य’
पदयात्रेच्या काळात राज्यात अगदी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यावर प्रशांत किशोर यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यामध्ये त्यांना यशही आल्याचे दिसत होते. अनेकदा त्यांच्या पदयात्रेमध्ये दोन लाखांपर्यंत लोक सहभागी झाल्याचे दिसून आले होते. नितीशकुमार यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार या मुद्द्यावर त्यांनी विशेषत: तरुणांना आकर्षित केल्याचे दिसत होते. प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाच्या हाती काही लागले नाही.
आम्ही ही निवडणूक अतिशय गांभीर्याने लढलो. आम्ही प्रयत्नांमध्ये कोणतीही कसूर केली नाही. पण जनतेने आमच्यावर विश्वास का ठेवला नाही, याचे आम्ही विश्लेषण करू आणि त्यावर विचारमंथन करू. आम्हाला अपयश आले असले तरी राज्यात कारभाराच्या गंभीर समस्या आहेत, हे मुख्य राजकीय पक्षांना मान्य करायला लावण्यास आम्ही भाग पाडले.- पवन के. वर्मा, प्रवक्ते, जनसुराज पक्ष
