Sridhar Vembu Advice On Marriage In 20s: झोहो या तंत्रज्ञान कंपनीचे प्रमुख श्रीधर वेम्बू हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते विविध विषयांवर करणाऱ्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. अशात त्यांनी आता तरुण-तरुणींना, “वयाच्या २०व्या वर्षी लग्न करा आणि मुले जन्माला घाला” असा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे.

श्रीधर वेम्बू काय म्हणाले?

श्रीधर वेम्बू यांनी आज (बुधवारी) एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी मला भेटणाऱ्या प्रत्येक तरुण आणि तरुणींना २०व्या वर्षी लग्न करण्याचा आणि मुले जन्माला घालण्याचा सल्ला देतो. तसेच लग्न आणि मुले जन्माला घालणे पुढे ढकलू नका, असे आवाहन करतो.”

“मी त्यांना सांगतो की त्यांनी समाज आणि त्यांच्या पूर्वजांप्रती असलेले त्यांचे लोकसंख्याशास्त्रीय कर्तव्य बजावले पाहिजे. मला माहिती आहे की या कल्पना विचित्र किंवा जुन्या पद्धतीच्या वाटू शकतात, परंतु मला खात्री आहे की हे विचार पुन्हा एकदा पटतील”, असे श्रीधर वेम्बू यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयआयटी हैदराबादमधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाबाबत उपासना कोनिडेला यांनी लिहिलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना श्रीधर वेम्बू यांनी तरुणांना हा सल्ला दिला आहे.

उपासना कोनिडेला यांची पोस्ट

उपासना कोनिडेला यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आयआयटी हैदराबादमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला खरोखरच खूप मजा आली. जेव्हा मी विचारले, ‘तुमच्यापैकी किती जणांना लग्न करायचे आहे?’ यावर, तरुणींपेक्षा तरुणांनी मोठ्या संख्येने हात वर केले! यातून हे दिसते की महिला करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.”

तरुणांना वीसाव्या वर्षीच लग्न का करायचे नाही?

श्रीधर वेम्बू यांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया देताना गौरव चौधरी नावाच्या एका युजरने म्हटले की, “प्रत्येकजण तरुणांना वयाच्या २०व्या वर्षी लग्न करण्याचा सल्ला देत असतो, परंतु अस्थिर पगारावर कुटुंब कसे चालवायचे याबद्दल प्रत्यक्ष कोणीही बोलत नाही.”

“आजच्या तरुणांना जबाबदारीची भीती वाटत नाही. त्यांना अस्थिर पगार, शून्य वर्क-लाईफ बॅलन्स आणि उत्पन्नाच्या ४०% भाग खाणारे भाडे यावर कुटुंब उभारण्याची भीती वाटते. हे लोकसंख्याशास्त्रीय संकट नाही, तर आर्थिक संकट आहे. हे संकट आधी दूर करा, त्यानंतर लग्नासाठी तरुण स्वतःहून हात वर करतील”, असे तो पुढे म्हणाला.