Zohran Mamdani Speech: न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी निवडून येताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. विजयानंतरच्या भाषणात बोलत असताना त्यांनी त्यांचा विजय न्यूयॉर्क शहरासाठी एक नवी पहाट असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या उमेदवारीपासून त्यांचा जोरदार विरोध केला होता. ममदानी पराभूत होतील, असे प्रयत्न त्यांनी केले. मात्र तरीही ममदानी यांनी ५० टक्क्यांहून अधिकची मते घेत विजय मिळवला. विजयी सभेत केलेल्या भाषणात त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.

विजयी सभेत बोलत असताना ममदानी म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प, मी तुम्हाला जितपत ओळखतो, त्यानुसार तुम्ही आता मला ऐकत असाल. त्यामुळे तुमच्यासाठी एवढेच म्हणेण. जरा आवाज वाढवा.”

ममदानी म्हणाले, जिया शहरात डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला, तेच शहर आता देशाला दाखवेल की, ट्रम्प यांना कसे पराभूत केले जाते. राजकीय काळोख पसरला असताना या क्षणी न्यूयॉर्कमध्ये मात्र एक नवी पहाट झाली आहे. मला माहिती आहे की, तुम्ही मला आता ऐकत आहात, त्यामुळे जरा आवाज वाढवा.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती धमकी

३४ वर्षीय जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे महापौर होणारे पहिले मुस्लीम आणि भारतीय वंशाचे नागरिक ठरले आहेत. तसेच एका शतकापासून त्यांच्या इतका तरूण महापौर शहराला मिळाला नव्हता. जोहरान ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्कला दिला जाणारा निधी बंद केला जाईल, अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. तसेच ममदानी हे कम्युनिस्ट आहेत, अशीही टीका ट्रम्प यांनी केली होती.

मुस्लीम असल्याबद्दल माफी मागणार नाही

जोहरान ममदानी आपल्या भाषणात म्हणाले, माझ्या मुस्लीम या ओळखीबाबत आणि लोकशाही समाजवादी असल्याबाबत मी माफी मागणार नाही. मी तरूण आहे, मी मुस्लीम आहे, मी लोकशाही समाजवादी विचारांना माननारा आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी मी माफी मागणार नाही.

न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून निवडून आल्यास श्रीमंतावर अधिक कर लावणार असल्याचे सुतोवाच ममदानी यांनी केले होते. तसेच शहरात घरांच्या वाढत्या भाड्याबाबत त्यांनी काम करण्याचे आश्वासन दिले होते. महत्त्वाचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीशांना अभय दिले होते. अशा अब्जाधीशांवर कर लावून ट्रम्प यांना थेट आव्हान देण्याचे काम ममदानी यांनी केले होते.

अब्जाधीशांना कर चुकवण्यास आणि कर सवलीतांचा लाभ उचलण्यास परवानगी देणाऱ्या भ्रष्टाचाराच्या संस्कृतीचा मी अंत करेन, असे ममदानी यांनी जाहीर केले. जोहरान ममदानी यांनी आपल्या भाषणात आई मीरा नायर यांची स्तृती केली. माझ्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीत आईचा सुरुवातीपासून पाठिंबा होता, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रसिद्ध ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषणातील काही शब्दांचाही उल्लेख केला.