Pink paper to wrap gold-silver ornaments: सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आवड कोणाला नाही… इमिटेशन ज्वेलरी कितीही सुंदर डिझाइन्स देत असली तरी सोन्या-चांदीच्या दागिन्यांनाही तेवढंच महत्त्व आहे. अजूनही अनेक जण सोनाराकडून हवे तसे दागिने बनवून घेण्याला पसंती देतात. दागिने देताना दुकानदार एका गडद गुलाबी रंगाच्या कागदात दागिने लपेटून देतात. अनेकांना हे फारच साधारण वाटतं, तर काहींनी त्याकडे कधी लक्षही दिलं नसेल. दुकानदार का बरं हा गुलाबी कागद गुंडाळून दागिने देत असतील, यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊ…
का वापरला जातो हा गुलाबी कागद?
सोनं आणि चांदी हे दोन्ही हवा आणि दमटपणा असलेल्या वातावरणाच्या संपर्कात आल्याने त्यांची चमक कमी होते. अनेकदा हवेमुळे चांदी काळी पडते आणि सोन्याची चमक कमी होऊ लागते. या गडद गुलाबी कागदाला एका खास पद्धतीने तयार केलं जातं. जेणेकरून हा कागद हवेतला दमटपणा शोषून घेईल आणि हवेशी दागिन्यांचा संपर्क येणार नाही. दागिन्यांची चमक बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी केवळ दुकानदारच नाही, तर काही सामान्य लोकही त्याचा वापर करतात.
गुलाबी रंगाचा हा कागद दागिन्यांच्या सुरक्षेसाठीच नाही, तर हा दागिन्यांची सुंदरता कायम ठेवण्याचेही काम करतो. गुलाबी रंग सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सुंदरता आणखी वाढवतो. जेव्हा पण आपण सोन्याचे आणि चांदीचे दागिने या कागदावर ठेवले जातात, तेव्हा ते आणखी सुंदर दिसतात. हेही त्यामागचं एक कारण आहे की, सोनार कित्येक वर्षांपासून हा गुलाबी रंगाचा कागद वापरतात.
कापूस
पूर्वीच्या काळी जेव्हा सोनारांकडे दागिने ठेवण्यासाठी किंवा ग्राहकांना देण्यासाठी डब्बे नव्हते, तेव्हा याच कागदात दागिने दिले जात. अनेक सोनार कापसामध्ये दागिने ठेवून नंतर ते या गुलाबी कागदात ठेवत असत. कापसात दागिने ठेवल्याने दागिन्यांपर्यंत दमट हवा पोहोचत नाही. आताही सोनार या गुलाबी कागदाचा वापर करतात. एवढ्या वर्षांनंतरही हा ट्रेंड जुना झालेला नाही.