पासपोर्ट हा परदेशात प्रवास करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज असतो. जो प्रत्येक देशाकडून त्यांच्या अधिकृत नागरिकाला दिला जातो. आधारकार्ड, पॅनकार्डप्रमाणे पासपोर्ट हा आपण देशाचे नागरिक असल्याचा पुरावा असतो. पासपोर्टमुळे व्यक्तीला परदेशात प्रवास करण्याची आणि परदेशातून पुन्हा आपल्या देशात येण्याची परवानगी मिळते. पासपोर्ट आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक वैध पुरावा आणि आपले ओळखपत्र असते. पण पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना अनेक अधिकृत कागदपत्रांची गरज असते. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्हाला माहिती आहे का की, भारतात पासपोर्टचे एकूण किती प्रकार आहेत? अनेकांना हे प्रकार माहीत नसतात. त्यामुळे भारतात पासपोर्टचे किती प्रकार असतात आणि त्यांचे फायदे काय आहे जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्य पासपोर्ट (Ordinary Passports)

सामान्य पासपोर्ट हा सामान्य प्रवाशांसाठी जारी केला जातो. जो फिरण्यासाठी, व्यवसायासाठी किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वापरला जातो. हा पासपोर्ट अगदी गडद निळ्या रंगाचा असतो. यात ३० ते ६० पाने असतात. तसेच याला पी-प्रकार पासपोर्ट असेही म्हणतात. कस्टम अधिकार्‍यांना सामान्य माणूस आणि भारतातील उच्चपदावर असलेले सरकारी अधिकारी यांच्यातील फरक समजून घेण्यास हा पासपोर्ट सक्षम असतो.

डिप्लोमॅटिक पासपोर्ट (Diplomatic or Official Passport)

भारतातील बडे राजकीय नेते, बड्या व्यक्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना हा पासपोर्ट दिला जातो. यामुळे संबंधित पासपोर्टधारक सरकारी अधिकारी परदेशी दौऱ्यांदरम्यान विविध लाभांसाठी पात्र ठरतो. तसेच, या डिप्लोमॅटिक पासपोर्टधारकांना इमिग्रेशन औपचारिकतेतून सहज क्लिअरन्स मिळू शकतो. यामुळे इतरांपेक्षा त्यांचा प्रवास हा अगदी जलद होतो. हा पासपोर्ट मरुन रंगाचा असतो. याला डी-प्रकार पासपोर्ट असे म्हणतात.

ऑरेंज पासपोर्ट (Orange Passport)

२०१८ पासून पासपोर्टचा हा प्रकार भारतीय नागरिकांसाठी जारी केला जाऊ लागला आहे, सरकारने हा पासपोर्ट अशा प्रकारे लाँच केला आहे, जो इतर पासपोर्टपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. हा पासपोर्ट अशा लोकांना ओळखण्यासाठी आहे ज्यांनी दहावीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही. सामान्य पासपोर्टप्रमाणे या पासपोर्टला शेवटचे पान नसते. जे लोक शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाहीत ते ECR (Emigration Check Required) श्रेणीत येतात. शैक्षणिकदृष्ट्या पात्र नसलेल्या भारतीयांच्या सुरक्षित प्रवासासाठीआणि वास्तव्य सुनिश्चित करण्यासाठी हा पासपोर्ट जारी करण्यात आला आहे.

पांढरा पासपोर्ट (White Passport)

भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना परदेशात प्रवास करण्यासाठी हा पासपोर्ट जारी केला जातो. हा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट मानला जातो. या पासपोर्टचा रंग पांढरा असतो. हा पासपोर्ट अधिकृत पद आणि भेटीच्या प्रकारावर अवलंबून पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैध असतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian passports four types of passports in india and their benefits uses and more sjr