Why Plastic Stools Have Holes: रोजच्या वापरात प्लास्टिकचा वापर खूप वाढलेला आहे. मानवी जीवन जणू प्लास्टिकविना शक्यच नसल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. आपण घरी, बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात, ऑफिसमध्ये किंवा क्लिनिकमध्ये एक साधं प्लास्टिकचं स्टूल अनेक वेळा पाहतो आणि त्याचा उपयोगही करतो. पण कधी विचार केला आहे का या स्टूलच्या अगदी मधोमध एक छिद्र का असतं? अनेकांना वाटतं ते फक्त डिझाइनसाठी आहे; तर काही जण त्याकडे फक्त दुर्लक्ष करतात. पण खरं उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण- हे छिद्र फक्त फॅशनसाठी नसून कामासाठी आहे. चला तर मग यामागील खरं कारणे कोणती जाणून घेऊयात…

प्लास्टिकच्या स्टुलाला मधोमध छिद्र असण्याचे कारणे खालीलप्रमाणे-

१. हाताळणी सुलभ होण्यासाठी

प्लास्टिकच्या स्टुलाला मधोमध छिद्र असण्याचे पहिलं कारण म्हणजे हाताळणी सुलभ होण्यासाठी. प्लास्टिकच्या स्टुलामधील हे छिद्र स्टूल उचलण्यासाठी सोपं असतं. तुम्हाला छिद्राच्या साह्यानं हे स्टूल सहज उचलता येतं.

२. पाणी साठू नये म्हणून

तर दुसरं कारण म्हणजे स्वच्छतेसाठी हे छिद्र अतिशय महत्त्वाचं आहे. स्टूल जर बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात किंवा ओल्या जागेत वापरलं जात असेल, तर त्यावर पाणी साठू नये म्हणून मधोमध छिद्र असतं. त्यामुळे पाणी लगेच वाहून जातं आणि स्टूल लवकर कोरडं राहतं.

३. स्टूल मजबूत आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी

तिसरं कारण थोडं तांत्रिक आहे. प्लास्टिक मोल्डिंगच्या प्रक्रियेत जेव्हा गरम प्लास्टिक साच्यात ओतलं जातं, तेव्हा मधोमध छिद्र असण्यामुळे धातूचा प्रवाह आणि थंड होण्याची गती नियंत्रित होते. त्यामुळे स्टूल मजबूत तयार होतं. तसेच छिद्र असल्यामुळे प्लास्टिकचा वापर थोडा कमी होतो आणि त्याचं वजन कमी होऊन उत्पादन खर्चही कमी होतो.

४. हवा खेळती ठेवण्याचं काम करतं

उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी, या छिद्रामुळे हवा खेळती राहते आणि त्यामुळे बसणाऱ्याला आरामदायक वाटतं. विशेषतः गरम हवामान असलेल्या ठिकाणी, जेव्हा एखादी व्यक्ती स्टुलावर बराच वेळ बसते, तेव्हा शरीराचा तळभाग गरम होतो, घाम येतो, आणि अस्वस्थता जाणवते. अशा वेळी, स्टुलामधील हे मधले छिद्र हवा खेळती ठेवण्याचं काम करतं.

५. स्टुलाची ताकद वाढवण्यास मदत

प्लास्टिकच्या स्टुलावरील हे छिद्र स्टुलाची ताकद वाढवण्यास मदत करतं. हे छिद्र स्टुलाच्या रचनेची मजबुती वाढवतं. जेव्हा कोणी व्यक्ती स्टुलावर बसते, तेव्हा तिचं संपूर्ण वजन एका मर्यादित क्षेत्रावर येतं. छिद्र असणं म्हणजे ते वजन अधिक समान पद्धतीने विभागलं जातं, ज्यामुळे प्लास्टिक तुटण्याची शक्यता कमी होते.

अशाप्रकारे या एका छोट्याशा छिद्रामागे अनेक मोठे कारणे दडलेली आहेत.