japanese adult adoption : आत्तापर्यंत आपण लहान मुलांना दत्तक घेतले जाते हे ऐकून आहोत. भारतात दरवर्षी हजारो अनाथ मुलांना दत्तक घेतले जाते. वंधत्वाची समस्या किंवा मुलं जन्माला न देण्याचा विचार करणारी जोडपी विशेषत: मुल दत्तक घेतात. यात काही लोक एका अनाथ मुलाला हक्काचं घर मिळावं या उद्देशानेही मुल दत्तक घेतात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असा एक देश आहे, जिथे लहान मुलांप्रमाणे प्रौढांनाही दत्तक घेण्याची प्रथा आहे. पण ही प्रथा सुरु करणारा देश कोणता आणि त्यामागचे कारण काय जाणून घ्या…

आकाराने अतिशय लहान असलेला जपान देश आधुनिक क्रांतीच्या बाबतीत अग्रेसर आहे. पण या देशात आजही अनेक पू्र्वापार चालत आलेल्या रुढी- परंपरा पाळल्या जातात. यातीलचं एक परंपरा म्हणजे प्रौढांना दत्तक घेण्याची. जपानमध्ये लहान मुलांप्रमाणे प्रौढांना दत्तक घेण्याची प्रथा आहे. अनेक लोक ज्यांचे स्वतःचे कोणी नाही, ते उत्तराधिकारासाठी प्रौढ पुरुषांना दत्तक घेतात, जेणेकरून तो त्यांचा संपूर्ण व्यवसाय सांभाळेल. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना दत्तक घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

जपानी कायद्यानुसार, लोक कायदेशीररित्या आपल्या नातेवाइकांशिवाय अनोळखी प्रौढ व्यक्तींना दत्तक घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळू शकतात. या जुन्या प्रथेचा उद्देश रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त कुटुंबाचे नाव, व्यवसाय आणि वंशाचा विस्तार करणे हा आहे. ही परंपरा दक्षिण जपानमध्ये सर्वाधिक चालते. या ठिकाणी अनेक व्यावसायिक कुटुंबांनी दत्तक घेण्यासाठी अशा लोकांची निवड केली आहे जे चांगले उत्तराधिकारी बनू शकतील. यात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी वारस अर्थात मुलगा नाही. म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे लग्न अशा व्यक्तीशी लावून दिले आणि नंतर तिला दत्तक घेतले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पूर्वी जपानमध्ये दत्तक घेतलेल्या लोकांपैकी ९८ टक्के प्रौढ पुरुष आहेत. त्यांचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. तर लहान मुलांना दत्तक घेण्याची संख्या केवळ २ टक्के आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बहुतेक व्यावसायिक कुटुंबे अशा लोकांना दत्तक घेतात आणि नंतर त्यांचा संपूर्ण व्यवसाय त्यांच्याकडे सोपवतात. कारसह अनेक वाहनांची निर्मिती करणारी सुझुकी ही सुप्रसिद्ध कंपनी देखील एका दत्तक मुलाच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ काळापासून सुरु आहे.

आजकाल जपानमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट्स सुरू झाल्या आहेत. त्यावर स्त्रिया अशा पुरुषांचा शोध घेतात, जे त्यांच्याशी लग्न करून दत्तक पुत्र होऊ शकतात. ही वेबसाइट खूप प्रसिद्ध होत आहे. याचे एक कारण म्हणजे जपानमध्ये जन्मदर कमी होत आहे आणि अनेकांना एकच मुलगी आहे. अशा परिस्थितीत त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी पुरुषाची गरज आहे. यामुळे जपानमध्ये अनेक पुरुष अशा स्त्रिचाही शोध घेतात, जिच्याशी लग्न करुन ते तिच्या व्यावसायिक घराचे मालक बनू शकतात.