Pink Color गुलाबी रंग हा डोळ्यांना आल्हाददायक आणि प्रसन्न करणारा रंग आहे. मात्र या रंगाच्या वस्तू खरेदी करणं हे तुमच्या खिशाला थोडी अधिकची कात्री लावणारं ठरतं. याचं कारण बुटापासून परफ्युम पर्यंत आणि ड्रेस, खेळण्यांपासून गाड्यांपर्यंत गुलाबी रंगाच्या वस्तू इतर रंगाच्या वस्तूंच्या तुलनेत महाग असतात. यामागचं कारण काय आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलाबी रंगाच्या वस्तू, कपडे, खेळणी सगळंच महाग

बाईक असो, सायकल असो किंवा कपडे, बुट, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू किंवा अगदी खेळणी असोत त्यांचा रंग गुलाबी असेल तर इतर रंगांच्या तुलनेत या वस्तू काहीशा महाग असतात. Boomerang Commerce ने एक सर्व्हे करुन यासंदर्भातले निष्कर्ष काढले आहेत. त्यांचा असा दावा आहे की गुलाबी रंगांच्या वस्तू, कपडे, खेळणी, टेक्नॉलॉजीशी संबंधित गॅजेट्स या सगळ्या गोष्टी इतर रंगांच्या तुलनेत १५ टक्क्यांनी महाग असतात. महिला गुलाबी वस्तूंसाठी जास्त किंमत मोजतात. यालाच पिंक टॅक्सही म्हटलं जातं.

पिंक टॅक्स किंवा गुलाबी कर म्हणजे काय?

पिंक टॅक्स किंवा गुलाबी कर याचा थेट संबंध महिलांशी आहे. हा टॅक्स कुठल्याही प्रकारचा अधिकृत असा टॅक्स नाही. पण ही एक प्रकारची अतिरिक्त किंमत आहे. निळ्या रंगाची वस्तू घ्यायची असेल आणि त्या वस्तूची किंमत १०० रुपये असेल तर तशीच गुलाबी रंगाची वस्तू घेण्यासाठी ११५ रुपये मोजावे लागतात. यालाच व्यावसायिक भाषेत पिंक टॅक्स असं म्हटलं जातं. महिलांच्या गुलाबी रंगाच्या वस्तू, गॅझेट्स हे सगळं काही महाग असतं. त्यामुळे याला पिंक टॅक्स म्हटलं जातं.

महिलांसाठी तयार करण्यात आलेली उत्पादनं महाग

महिलांसाठी तयार करण्यात आलेली खास उत्पादनं जसे की मेक अपचं सामान, नेल पेंट, लिपस्टिक, आर्टिफिशियल ज्वेलरी, सॅनेटरी पॅड या सगळ्या गोष्टी गुलाबी रंगात असतात आणि त्यांची किंमत ही अतिरिक्त असते. Fortune या मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा रिटेलर दुकानदार गुलाबी वस्तू महाग झाल्याचं सांगत असतात. लाल आणि गुलाबी रंगाच्या बाईकपैकी लाल बाईक जास्त विकल्या जातात कारण गुलाबी रंगाच्या बाईकची किंमत जास्त असते. यावरुन लक्षात येतं की गुलाबी रंगाच्या वस्तू महाग का असतात?

महिलांशी गुलाबी रंग कसा जोडला गेला?

साधारण १९४० च्या दशकात पॅरीस या ठिकाणी फॅशन इंडस्ट्री सुरु झाली आहे. पॅरीस ही फ्रान्सची राजधानी आहे. या ठिकाणी असलेल्या आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येत असत. १९४० च्या दशकात या ठिकाणी येणारे पर्यटक, खास करुन महिला गुलाबी रंगाचे कपडे खरेदी करत. पॅरीसमध्ये मग गुलाबी रंगाचे ( Pink Color ) कपडे मुली किंवा महिलांसाठी आणि निळ्या रंगाचे कपडे मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी तयार केले जाऊ लागले. पॅरीसचं हे अनुकरण जगाने उचललं आणि तिथून गुलाबी रंग हा मुलींचा किंवा महिलांचा झाला असं सांगितलं जातं.

१९४० ते १९५० च्या दशकात गुलाबी रंगाचे ( Pink Color ) अनेक कपडे, खेळणी ही मुलींच्या खेळण्यांशी जोडली गेली. तर निळ्या रंगाची खेळणी, कपडे हे मुलांशी जोडले गेले. साधारण सतराव्या शतकाच्या शेवटी द बॉय अँड द पिंकी नावाचं एक पेंटिंग प्रसिद्ध झालं होतं. ज्यातला मुलगा निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तर मुलगी गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये उभी होती. त्याचा हा प्रभाव पुढे पडत गेलेला दिसून आल्याचंही सांगितलं जातं. १९६० च्या दशकात आलेली बार्बी ही डॉलही गुलाबी रंगांच्या ( Pink Color ) कपड्यांमध्येच होती. त्यामुळे हा ट्रेंड तोपर्यंत चांगलाच प्रचलित झाला की गुलाबी रंग हा मुलींचा म्हणून ओळखला जाऊ लागला.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pink color why are everything from pink clothes shoes toys to even bikes expensive scj